Patur Panchayat Samiti: पातूर पंचायत समितीच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे पहिल्यांदाच आमसभा रद्द झाली आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याने आमसभा रद्द करण्यात आली.
पातूर (Patur Panchayat Samiti) : पातूर पंचायत समितीच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे पहिल्यांदाच आमसभा रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. आमदार नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही महत्त्वाची सभा अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने उघड झाला प्रशासनाचा बेजबाबदारपणा; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वाढली चर्चा
दिग्रस येथील श्री सोपीनाथ महाराज संस्थान येथे या आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी तसेच कृषी, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आणि बांधकाम विभागातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही सभा महत्त्वाची मानली जात होती. (Patur Panchayat Samiti) आगामी उन्हाळ्याच्या दृष्टीने अनेक गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत असून यावर उपाययोजनाकरिता या आमसभेमध्ये विशेष निधी किंवा विशेष कामे मंजूर केल्या जात असतात लोकप्रतिनिधी म्हणून आमदार नितीन देशमुख हे जनतेच्या समस्या या निमित्ताने मार्गी लावत असतात. आमदार स्वतः उपस्थित राहणार असल्याने अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, जबाबदार अधिकारीच गैरहजर राहिल्याने सभा रद्द करण्याची वेळ आली.
पंचायत समितीतील (Patur Panchayat Samiti) अनेक विभागांचे अधिकारी अनुपस्थित राहिल्यामुळे यासोबतच याबाबत सविस्तर माहिती ग्रामीण भागातील जनतेला देण्यात आली नाही कारण आमसभेला कमीत कमी लोक उपस्थित राहिले पाहिजे ही पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची व नियोजन करणाऱ्यांची नीती होती कारण जास्तीत जास्त लोक उपस्थित राहिल्यास समस्या निर्माण होऊन अधिकाऱ्यांचे गोड बंगाल बाहेर येऊ शकते यामुळे ही आमसभा केवळ कागदपत्रे आटवून आमसभा संपन्न झाली हे दाखविण्याचा प्रताप पातुर पंचायत समितीकडून सुरू होता अशा यावरून पंचायत समितीच्या
प्रशासनातील समन्वयाचा पूर्ण अभाव स्पष्ट झाला आहे. गटविकास अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर कोणताही वचक नसल्याची चर्चा असून, काही अधिकारी ठेकेदारांच्या दबावाखाली काम करत असल्याचे आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.
दरम्यान, (Patur Panchayat Samiti) पंचायत समितीतील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचेही समोर येत आहे. विशेषतः पेव्हर ब्लॉकच्या कामांमध्ये टक्केवारीवर व्यवहार होत असल्याची चर्चा असून, निधी मंजुरीपासून ते बिल काढण्यापर्यंत आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे आरोप आहेत. काही दिवसांपूर्वी याच कामावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये पंचायत समिती कार्यालयातच वाद झाल्याचीही चर्चा रंगली होती. अनेक पदाधिकारी हे केवळ जनतेच्या समस्या सोडवण्याकरिता नाहीतर विकास कामाचे बिले काढण्याकरिता पंचायत समितीच्या चकरा मारत असल्याचे चित्र आहे काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे सामाजिक कार्यकर्ते कमी आणि ठेकेदार जास्त असे चित्र पंचायत समितीच्या आवारात दिसत आहे
या पार्श्वभूमीवर (Patur Panchayat Samiti) पंचायत समितीचा कारभार पूर्णपणे ढेपाळल्याचे चित्र असून, सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या आमसभाच रद्द होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आमदार नितीन देशमुख यांनी लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पंचायत समितीच्या कारभारावर अंकुश ठेवून पारदर्शकता आणण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आगामी आमसभेत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार असून, त्यावर काय कारवाई होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.