संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असताना पाथरी विधानसभा मतदारसंघातील समर्थक शिवसैनिकांची ७ रोजी शहरातील प्रियल हॉटेल येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
खा. जाधवांच्या समर्थनार्थ पाथरीत शिवसैनिक एकवटले; पक्ष नेतृत्वावर नाराजी
पाथरी (Parbhani Politics) : खासदार संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असताना पाथरी विधानसभा मतदारसंघातील समर्थक शिवसैनिकांची गुरुवार (७) रोजी शहरातील प्रियल हॉटेल येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत उपस्थित शिवसैनिकांनी खासदार जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करत पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
मागील दोन महिन्यांपासून खासदार जाधव यांच्या पक्ष सोडण्यासंदर्भातील चर्चांना उधाण आले असून, त्याच पार्श्वभूमीवर सकाळी साडेदहा वाजता आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पक्षात सध्या एकतर्फी पक्षांतराची चर्चा सुरू असून, खासदार साहेबांना एकाकी पाडण्याचे काम सुरू आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाने कार्यकर्ते व खासदार जाधव यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, गंगाखेड विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आल्याबद्दल कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. “आमच्यासाठी मातोश्री, पक्ष आणि नेतृत्व म्हणजे खासदार संजय जाधव आहेत. जन्मापासून मरेपर्यंत आम्ही शिवसैनिक म्हणूनच राहणार,” अशा भावना परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले पाटील, विधानसभा प्रमुख डॉ. राम शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बाराहत्ते यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी खासदार जाधव यांच्या पक्षनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांवरही जोरदार टीका केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर पक्षाचे उपनेते म्हणून खासदार संजय जाधव यांनी अत्यंत एकनिष्ठपणे पक्षाला साथ देत विरोधकांना धारेवर धरण्याचे काम सातत्याने केले आहे. आमदार आणि तीन वेळा खासदार राहूनही पक्षाशी प्रामाणिक राहिलेल्या नेत्यावर अविश्वास दाखवण्याचे काम पक्षाकडून होत असल्याने कार्यकर्ते दुखावले असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांबाबत खासदार जाधव यांना विश्वासात न घेता त्यांच्या विरोधात बैठका घेतल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला. आगामी काळात खासदार जाधव जो निर्णय घेतील, त्या निर्णयामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
यावेळी परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा तालुकाप्रमुख पंढरीनाथ घुले पाटील, विधानसभा प्रमुख डॉ. राम शिंदे, तालुकाप्रमुख माणिकराव काळे, भगवानराव पायघन, प्रल्हाद लाड, युवासेना जिल्हाप्रमुख दीपक बाराहत्ते, युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश जाधव, बंटी शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख पांडुरंग शिंदे, शहर प्रमुख अनिल जाधव, युवासेना शहर प्रमुख राधे गिराम, युवासेना तालुका संघटक सिद्धेश्वर इंगळे, पंचायत समिती सदस्य पिंकू शिंदे, श्रीधर गिराम, विराज मांडे, पिंटू निर्वळ, रामप्रसाद म्हस्के, गोकुळ वाघमोडे, सुरेश नखाते, शरद कोल्हे, फुलचंद गहिरे, गुलाब दळवे, दीपक बचाटे, अकरूर मगर, संतोष धोंडगे, दिगंबर चौधरी, बबन शिंदे, रुस्तुम कलिंदर, सुरेश बागवाने, बाळासाहेब नरवडे तसेच पाथरी मतदारसंघातील सर्कल प्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुख, आजी-माजी सरपंच व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
निर्णयाच्या उंबरठ्यावर खासदार?..
मागील दोन महिन्यांपासून खा. संजय जाधव यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. भाजपा अथवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याबाबत विविध तर्कवितर्क रंगत असताना पाथरी येथे समर्थकांनी घेतलेली ही जिल्ह्यातील पहिली मोठी बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
बैठकीदरम्यान “खासदार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” अशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना महत्त्वपूर्ण ठरल्या. त्यामुळे खा. जाधव लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या भाषणांमधील शब्दप्रयोग, पक्ष नेतृत्वाबद्दल उमटलेली नाराजी आणि “आम्ही खासदार साहेबांसोबतच” ही भूमिका पाहता भविष्यात ते उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे झुकू शकतात, अशी चर्चा बैठकीनंतर अधिक गडद झाली आहे.