आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसुविधा तसेच धार्मिक वातावरण अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
15 ते 29 जुलैपर्यंत निर्बंध लागू; भाविकांच्या धार्मिक भावना जपण्यासाठी निर्णय, वारकऱ्यांच्या सेवेसाठी पंढरपूर आगारात 'राजमाता जिजाऊ'च्या पाच नव्या बसेस दाखल
पंढरपूर : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसुविधा तसेच धार्मिक वातावरण अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून 29 जुलैपर्यंत सलग 15 दिवस पंढरपूर शहर आणि परिसरात मांस व मटण विक्रीवर पूर्णतः बंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आषाढी यात्रेदरम्यान दररोज लाखो वारकरी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी दाखल होत असल्याने शहरात पवित्र आणि भक्तिमय वातावरण कायम राहावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
वारीच्या काळात शहरातील विविध भागांत सुरू असलेली मांस व मटण विक्री भाविकांच्या धार्मिक भावना दुखावू शकते, अशी बाब लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 15 ते 29 जुलै या कालावधीत पंढरपूर शहरासह आसपासच्या परिसरात कुठेही मांस किंवा मटणाची विक्री करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, आषाढी यात्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही महत्त्वाची तयारी केली आहे. यात्रेपूर्वी पंढरपूर आगाराला 'राजमाता जिजाऊ' मालिकेतील पाच नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बससेवेचे लोकार्पण पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की, आषाढी वारीसाठी येणाऱ्या लाखो विठ्ठलभक्तांना सुरक्षित, दर्जेदार आणि वेळेवर वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासन आणि एसटी महामंडळाची जबाबदारी आहे. यात्रा सुरू होण्यापूर्वी पंढरपूर आगाराला आणखी काही नवीन बसेस उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या नव्या बसेसमुळे आषाढी वारीदरम्यान भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.