देशभरात NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून सुरू असलेला वाद अद्यापही थांबलेला नाही.
बीडच्या दोन विद्यार्थ्यांचा OMR तफावतीचा दावा; पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर नव्या वादाला तोंड
बीड : देशभरात NEET परीक्षेतील गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून सुरू असलेला वाद अद्यापही थांबलेला नाही. राजधानी दिल्लीत ज्येष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण करत असताना, दुसरीकडे NEET पुनर्परीक्षेच्या निकालानंतर बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या दोन प्रकरणांनी निकालाच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी येथील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी पवार हिने नुकतीच झालेली NEET परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर उत्तरतालिका (Answer Key) तपासल्यानंतर आपल्याला 700 पेक्षा अधिक गुण मिळतील, असा विश्वास तिने व्यक्त केला होता. मात्र, अधिकृत स्कोअरकार्डमध्ये तिला केवळ 87 गुण मिळाल्याचे दिसून आल्याने तिला आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. निकाल पाहताच ज्ञानेश्वरीला अश्रू अनावर झाल्याचे सांगितले जात आहे.
ज्ञानेश्वरीने OMR शीटमध्ये तफावत असल्याचा दावा केला आहे. परीक्षेनंतर उत्तरतालिका तपासताना अपेक्षित गुण मिळत असल्याने तिने एम्स दिल्लीमध्ये प्रवेशाचे स्वप्न पाहिले होते. परंतु अधिकृत निकालात अवघे 87 गुण दिसल्याने ती हादरली असल्याचे तिने सांगितले.
दरम्यान, ज्ञानेश्वरीची आई मीरा पवार यांनीही आपल्या मुलीला चुकीची OMR शीट देण्यात आल्याचा आरोप केला आहे. वर्षभर मुलीने प्रचंड मेहनत घेतली, दिवसातून 18-18 तास अभ्यास केला, अनेकदा जेवणाकडेही दुर्लक्ष केले, तरीही असा निकाल लागल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, OMR शीट आम्हाला लाईव्हमध्ये दाखवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील आणखी एका विद्यार्थ्याच्या निकालावरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सोहम गवते याने उत्तरपत्रिका आणि उत्तरतालिका तपासल्यानंतर आपल्याला 522 गुण मिळतील, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, अधिकृत स्कोअरकार्डमध्ये त्याला केवळ 95 गुण मिळाल्याचे समोर आले.
निकाल पाहिल्यानंतर सोहम काही काळ कोणाशीही बोलू शकला नाही, तर कुटुंबीयांनाही मोठा मानसिक धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही घटनांमुळे NEET परीक्षेच्या निकाल प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.