Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

बलिदानाची दखल घ्या, मिसिंग लिंकला शिंग्रोबा धनगरांचे नाव द्या : खा. वडकुतेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

पुणे-मुंबई दरम्यानच्या 'मिसिंग लिंक' महामार्गाला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे


बलिदानाची दखल घ्या मिसिंग लिंकला शिंग्रोबा धनगरांचे नाव द्या  खा वडकुतेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

National Highway Naming Demand |

हिंगोली (National Highway Naming Demand) : पुणे-मुंबई दरम्यानच्या 'मिसिंग लिंक' महामार्गाला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार रामरावजी वडकुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मंत्री अतुल सावे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार राहुल कुल, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. पंकज भिवटे, संजय कावडे व गोपाल सातपुते यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. या मागणीमुळे राज्यात ऐतिहासिक वारसा आणि हुतात्म्यांच्या स्मृती जतन करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, ब्रिटिश राजवटीत शिंग्रोबा धनगर यांनी देशहितासाठी मोलाचे योगदान दिले. सातारा जिल्ह्यात जन्मलेले शिंग्रोबा धनगर बोरघाट परिसरात मेंढपाळ म्हणून वास्तव्यास होते. मुंबई ते ठाणे रेल्वेमार्गाचा विस्तार पुण्यापर्यंत करण्यासाठी इंग्रज प्रयत्न करत असताना सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून मार्ग शोधणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. त्यावेळी शिंग्रोबा धनगर यांनी स्थानिक ज्ञानाच्या जोरावर घाटातून मार्ग कसा काढता येईल हे इंग्रजांना दाखवून दिले. त्यांच्या या योगदानामुळेच पुढील वाहतूक आणि दळणवळण सुलभ होण्यास मदत झाली.

इंग्रजांनी शिंग्रोबांना बक्षीस देऊ केले असता त्यांनी 'माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या' अशी मागणी केली. या उत्तराने संतप्त झालेल्या इंग्रजांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले. त्यामुळे शिंग्रोबा धनगर हे केवळ मार्गदर्शक नव्हे तर देशासाठी बलिदान देणारे क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात.

ज्या ठिकाणी शिंग्रोबा धनगर यांची हत्या करण्यात आली त्या ठिकाणी १९२९ साली स्मारक उभारण्यात आले असून आजही तेथे भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी जातात. धनगर समाजात त्यांना आधुनिक दैवताचा मान दिला जातो, असे खा. वडकुते यांनी नमूद केले.

राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक असलेल्या पुणे ते मुंबई मिसिंग लिंक महामार्गाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव देणे ही त्यांच्या बलिदानाची खरी आदरांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल आणि समाजात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा खा. वडकुते यांनी व्यक्त केली असून या विषयावरील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.