National Abacus Competition: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि भक्कम व्यासपीठ मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवरही देशात अव्वल येऊ शकतात, हे रिसोड येथील विश्वा पब्लिक स्कूल
संस्थेचे संस्थापक विश्वनाथजी सानप यांच्या हस्ते विशेष गौरव
रिसोड (National Abacus Competition) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि भक्कम व्यासपीठ मिळाल्यास ते राष्ट्रीय पातळीवरही देशात अव्वल येऊ शकतात, हे रिसोड येथील विश्वा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीने सिद्ध केले आहे. विद्यालयातील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कु. गौरी डांगे हिने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून, तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयात एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कु. गौरी डांगे हिने राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेच्या 'अॅक्युरसी कॅटेगरी' (Accuracy Category) मध्ये सर्वोत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे विश्वा पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या विशेष सोहळ्यात संस्थेचे संस्थापक व संचालक मा. श्री. विश्वनाथजी सानप यांच्या हस्ते गौरीला 'सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स' (Certificate of Excellence) व सन्मानचिन्ह (पदक) प्रदान करून गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना मा. श्री. विश्वनाथजी सानप म्हणाले, "गौरीसारखे विद्यार्थी इतरांसाठी आदर्श ठरतात. सर्व विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत, कठोर परिश्रम करावेत आणि उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा." गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारप्रधान वातावरण आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपद्धतीमुळे विश्वा पब्लिक स्कूलने अल्पावधीतच रिसोड परिसरातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून नाव कमावले आहे. विद्यालयाचे प्राचार्य श्री. जीभित नायक यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षकवृंदाच्या अथक परिश्रमांमुळे येथील विद्यार्थी विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करत आहेत.
विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांची माहिती देऊन सातत्याने प्रोत्साहित केले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मक वृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित होत आहेत. गौरीच्या या घवघवीत यशाबद्दल विश्वा पब्लिक स्कूल परिवारातील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.