Nanded Education Society: हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. नांदेड एज्युकेशन सोसायटीचा ७६ वा वर्धापन
'आय लव्ह पीपल्स कॉलेज’ सेल्फी पॉईंट, स्वामीजी कुटीचे उद्घाटन
नांदेड (Nanded Education Society) : हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या ध्येयाने २६ जून १९५० रोजी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीचा ७६ वा वर्धापन दिन शुक्रवारी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पीपल्स कॉलेज परिसरात उभारण्यात आलेल्या आकर्षक ‘आय लव्ह पीपल्स कॉलेज’ सेल्फी पॉईंटचे तसेच विद्यार्थ्यांच्या विश्रांतीसाठी बांबूपासून पर्यावरणपूरक पद्धतीने उभारलेल्या आणि ‘स्वामीजी कुटी’ असे नामकरण करण्यात आलेल्या कुटीचे उद्घाटन माजी खासदार तथा सोसायटीचे माजी अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास नांदेड एज्युकेशन सोसायटीचे (Nanded Education Society) अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, सचिव श्यामल पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, कार्यकारिणी सदस्य ॲड. चिरंजीलाल दागडीया, नगरसेविका शांभवी साले, नौनिहालसिंग जहागीरदार, डॉ. यशपाल भिंगे, प्रा. विलास वडजे, राहुल गोरे, डॉ. ए. टी. शिंदे, पीपल्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. विकास सुकाळे, उपप्राचार्य डॉ. विशाल पतंगे यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉलेजची ओळख आता सेल्फी पॉईंटमुळेही होते. यावेळी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे म्हणाले, "आजच्या डिजिटल युगात एखाद्या महाविद्यालयाची ओळख केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरती मर्यादित राहत नाही, तर विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमुळेही ती निर्माण होते. सेल्फी पॉईंट हे आजच्या पिढीशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे. याच विचारातून पीपल्स कॉलेजमध्ये प्रथमच भव्य आणि आकर्षक 'आय लव्ह पीपल्स कॉलेज' सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. हा सेल्फी पॉईंट संस्थेची ओळख अधिक व्यापक करेल आणि विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी यांच्यासाठी आकर्षणाचे नवे केंद्र ठरेल."
बांबूपासून साकारली पर्यावरणपूरक ‘स्वामीजी कुटी’
पीपल्स कॉलेजच्या (Nanded Education Society) प्रांगणातील कॅन्टीन परिसरात विद्यार्थ्यांसाठी बांबूपासून आकर्षक आणि पर्यावरणपूरक ‘स्वामीजी कुटी’ उभारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना संवाद, विश्रांती आणि विरंगुळ्यासाठी नैसर्गिक वातावरणात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. बांबू या नैसर्गिक व शाश्वत साधनसंपत्तीचा वापर करून कमी खर्चात टिकाऊ आणि देखणी रचना उभारण्यात आली आहे. पारंपरिक लोखंडी किंवा काँक्रीटच्या संरचनांना पर्याय ठरणारी ही कुटी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतानाच परिसराच्या सौंदर्यातही भर घालते आणि परिसरातील हिरवाईमुळे विद्यार्थ्यांना शांत, प्रसन्न व अभ्यासपूरक वातावरण लाभणार आहे.
हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मरणार्थ या कुटीला ‘स्वामीजी कुटी’ असे नाव देण्यात आले आहे. आधुनिक शिक्षणासोबत पर्यावरणपूरक विचार, स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर आणि शाश्वत विकासाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.