विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शिक्षक-शिक्षिका उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
हजारो शिक्षकांच्या उपस्थितीत नागपूर येथे तीव्र आंदोलन
नागपूर (Nagpur Teachers Protest) : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्याशी निगडित असलेल्या संचमान्यतेच्या ऑनलाईन मसुद्याविरोधात आज नागपूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर विदर्भातील शिक्षकांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत जोरदार आंदोलन केले. विज्युक्टाचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शिक्षक-शिक्षिका उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
या आंदोलनात विज्युक्टाचे केंद्रीय कार्यकारिणी सहसचिव डॉ. अभिजित पोटले, नागपूर शहराध्यक्ष डॉ. चेतन हिंगणेकर, नागपूर ग्रामीण अध्यक्ष डॉ. नितीन देवतळे, सचिव डॉ. गजानन धांडे, प्रा. विवेक देशमुख, प्रा. किशोर वरभे, प्रा. चौधरी, प्रा. आर. एस. पटले यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक, भौगोलिक व शैक्षणिक वास्तव लक्षात घेऊन संचमान्यता दिली जात होती. मात्र, चालू शैक्षणिक वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन मसुद्यात प्रचलित निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आले असून त्यामुळे हजारो शिक्षकांचा कार्यभार कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितावर, विषयांच्या उपलब्धतेवर आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणार असल्याची गंभीर चिंता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
आंदोलनादरम्यान डॉ. अशोक गव्हाणकर यांनी संचमान्यतेच्या मसुद्यातील त्रुटींची सविस्तर मांडणी करून भविष्यातील संभाव्य परिणाम स्पष्ट केले. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्था यांच्यावर अन्याय करणाऱ्या या धोरणाचा निषेध व्यक्त करत शासनाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे या आंदोलनात महिला शिक्षक भगिनींचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय होता. कडक उन्हाची पर्वा न करता त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिक्षण क्षेत्राविषयीची बांधिलकी आणि संघर्षशीलता अधोरेखित केली. शिक्षक बंधूंनीही तितक्याच जोमाने सहभाग नोंदवत शिक्षण व्यवस्थेच्या संरक्षणासाठी एकजुटीचा संदेश दिला.
आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षकांनी स्पष्ट संदेश दिला की, हा संघर्ष केवळ शिक्षकांच्या सेवासुरक्षेसाठी नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी आहे. समाज घडविणाऱ्या शिक्षण व्यवस्थेचे रक्षण करणे ही शिक्षकांची सामाजिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी आवश्यक ते सर्व लोकशाही मार्ग अवलंबले जातील.
शासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात यावर्षीची संचमान्यता प्रचलित निकषांच्या आधारे ऑफलाईन पद्धतीने करण्यात यावी, सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना ग्राह्य धरावे, विषय कार्यभार, प्रात्यक्षिके, स्वाध्याय व तुकडी टिकविण्याबाबतचे विद्यमान निकष कायम ठेवावेत, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी प्रा. मार्तंड गायधने, प्रा. अशोक गायधनी, प्रा. कोहपरे, प्रा. भेंडारकर, प्रा. विजय कुत्तरमारे, प्रा. प्रमोद भोयर, डॉ. प्रवीण चटप, प्रा. प्रमोद उरकुडे, डॉ. शालिनी तेलरांधे, प्रा. संजय लेनगुरे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, आजचे आंदोलन हा संघर्षाचा शेवट नसून सुरुवात आहे. प्रत्येक मोठ्या बदलाची चाहूल आधी लागते. त्या चाहुलीची वेळेत दखल घेऊन जागरूक होणे आवश्यक असते. शिक्षण व्यवस्थेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असताना शांत राहणे हा पर्याय असू शकत नाही. शिक्षकांची एकजूट, समाजाचा पाठिंबा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता या बळावर अन्यायकारक धोरणांना योग्य उत्तर दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षण व्यवस्था, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हितरक्षणासाठीचा हा निर्धार भविष्यात अधिक व्यापक स्वरूप धारण करेल, असा विश्वास व्यक्त करत आंदोलनाची सांगता करण्यात आली.
– डॉ. चेतन हिंगणेकर
अध्यक्ष, विज्युक्टा, नागपूर शहर