MLA Shweta Mahale Patil: एम.पी.एस.सी परिक्षे ऑनलाइन करण्याच्या विरोधात विद्यार्थीच्या स्वप्नांना नुकसान न होईल यासाठी आग्रमणारी श्वेता महाले पाटील यांनी विधानसभेत मागणी केली.
एमपीएससी परीक्षा ऑफलाईनच घ्या; आ. श्वेता महाले पाटील यांची विधानसभेत भावनिक मागणी
चिखली (MLA Shweta Mahale Patil) : "स्पर्धा परीक्षांसाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने ही केवळ त्यांच्या कुटुंबाचीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या भविष्याची आशा आहे. त्या स्वप्नांवर तांत्रिक त्रुटींचे सावट पडू देता कामा नये," अशा भावनिक शब्दांत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात युवकांच्या भविष्याचा प्रश्न सभागृहात मांडला.
औचित्याच्या मुद्द्याद्वारे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२६ संगणकाधारित ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. यापूर्वी विविध ऑनलाइन परीक्षांमध्ये तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन होणे, प्रणालीतील त्रुटी आणि गैरप्रकारांचे अनेक अनुभव राज्यातील विद्यार्थ्यांनी भोगले आहेत. दुसरीकडे, एमपीएससीच्या ऑफलाईन परीक्षा नेहमीच पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाला पात्र ठरल्या आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
"एखादा विद्यार्थी ग्रामीण भागातून येतो, त्याच्या आई-वडिलांनी कष्टाची कमाई खर्च करून त्याला शिक्षण दिलेले असते. अनेक युवकांनी नोकरीची स्वप्ने उराशी बाळगून वर्षानुवर्षे अभ्यास केला आहे. अशा वेळी तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा धोक्यात येणे हे अत्यंत वेदनादायी ठरेल," अशी भावना आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे मूल्य केवळ गुणांमध्ये मोजले जाऊ शकत नाही, तर त्यांच्या संघर्षामध्ये आणि त्यागामध्येही ते दडलेले असते. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाला समान, न्याय्य आणि पारदर्शक संधी मिळावी यासाठी एमपीएससी गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२६ ही ऑनलाइनऐवजी ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात यावी, अशी ठाम आणि आग्रही मागणी त्यांनी शासनाकडे केली.
युवकांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, हा स्पष्ट संदेश देताना आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) म्हणाल्या की, "स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्यांच्या स्वप्नांच्या रक्षणासाठी माझा संघर्ष आणि प्रयत्न कायम सुरू राहतील." विधानसभेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला दिलेला हा आवाज केवळ राजकीय भूमिका नसून, राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवक-युवतींच्या भावनांना दिलेला न्याय असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त होत आहे.