भ्यासाच्या जोरावर उदगीर तालुक्यातील देवूळवाडी येथील चार तरुणांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
आदर्श गावाची नवी ओळख – ‘पीएसआयचे गाव’
उदगीर (MPSC Success) : कठोर परिश्रम, जिद्द आणि नोकरीसोबत केलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर उदगीर तालुक्यातील देवूळवाडी येथील चार तरुणांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर या चौघांनी पीएसआय पदावर झेप घेत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदर्श गाव, तसेच ‘कविचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या देवूळवाडीने आता ‘पीएसआयचे गाव’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. एकाचवेळी एकाच गावातील चार जणांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड होणे ही घटना केवळ परिसरासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी दुर्मिळ आणि ऐतिहासिक मानली जात आहे. महाराष्ट्र पोलीस खात्याअंतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात देवूळवाडी येथील पोलीस दलात कार्यरत चार पोलीस हवालदारांनी हे यश संपादन केले आहे. त्यामुळे गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण पसरले आहे.
या यशस्वी उमेदवारांमध्ये प्रल्हाद अण्णाराव केंद्रे (बाबुले) यांचा समावेश आहे. त्यांची सन 2015 मध्ये अमरावती पोलीस दलात निवड झाली होती. सध्या ते अमरावती शहर पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्य पार पाडताना त्यांनी पीएसआय होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अथक परिश्रम घेतले आणि अखेर ते साकार केले. ज्ञानेश्वर नामदेव केदार यांची 2014 मध्ये यवतमाळ पोलीस दलात निवड झाली होती. सध्या ते पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. सातत्यपूर्ण अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनीही पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले.
दत्ता हनुमंत केंद्रे उर्फ पाटील हे सन 2016 पासून अमरावती येथे राज्य राखीव पोलीस बल (SRPF) मध्ये कार्यरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनीही पीएसआय पदावर यश मिळवले.
नामदेव गोपीनाथ कोळगीर यांची 2016 मध्ये नागपूर शहर पोलीस दलात निवड झाली होती. सध्या ते नागपूर पोलीस दलात कार्यरत असून त्यांच्या जिद्दी आणि चिकाटीमुळे त्यांनीही पोलीस उपनिरीक्षक पदावर आपली छाप उमटवली आहे. या चौघांच्या घवघवीत यशामुळे देवूळवाडी गावात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी हे यश प्रेरणादायी ठरत असून “मेहनत केली तर यश निश्चित मिळते” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
देवूळवाडीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, छोट्या गावातूनही मोठा इतिहास घडविता येतो.