मोशी येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे.
महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशींचा निर्णय; 81 तासांच्या बचाव मोहिमेनंतर चौकशीला वेग, बायोमायनिंग कंपनीच्याही भूमिकेची होणार तपासणी
पिंपरी चिंचवड : मोशी येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. चौकशी प्रक्रियेदरम्यान कोणताही हस्तक्षेप होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली असून, दोन्ही अधिकाऱ्यांना यापूर्वी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्या उत्तरांचा विचार केल्यानंतर निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. मोशी दुर्घटनेनंतर पर्यावरण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
दरम्यान, या प्रकरणात एंथोनी लारा रिन्यूएबल एनर्जी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी उपचार घेत असल्याने त्याच्यावरील पुढील कारवाई उपचार पूर्ण झाल्यानंतर होणार आहे.
कंपनीने महापालिकेला दिलेल्या खुलाशात, इमारतीवर कोसळलेला कचरा हा बायोमायनिंगचे काम करणाऱ्या कंपनीचा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता संबंधित बायोमायनिंग कंपनीच्या भूमिकेचीही स्वतंत्र चौकशी केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
गुन्हा दाखल करण्याबाबत आयुक्तांची भूमिका
संजय कुलकर्णी आणि योगेश आल्हाट यांचे निलंबन करण्यात आले असले, तरी त्यांच्या विरोधात तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. सध्या सुरू असलेल्या पोलीस तपासात त्यांच्या सहभागाचे पुरावे आढळल्यास त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच, एंथोनी लारा रिन्यूएबल एनर्जी कंपनीच्या संचालकांऐवजी दोन अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कंपनीनेच प्रकल्पाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांकडे असल्याचे महापालिकेला कळविल्याचे आयुक्तांनी सांगितले.
81 तासांचे बचावकार्य; 9 कामगारांचा मृत्यू
मोशी दुर्घटनेनंतर सुरू करण्यात आलेले शोध आणि बचावकार्य अखेर पूर्ण झाले आहे. तब्बल 81 तास चाललेल्या या मोहिमेनंतर 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, 14 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
ही दुर्घटना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोतील 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्यामुळे घडली होती.
चौकशीत अनेक प्रश्नांची उत्तरे अपेक्षित
दुर्घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रशासकीय इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला असताना पहिला आणि दुसरा मजला कोणाच्या परवानगीने उभारण्यात आला आणि वापरात आणण्यात आला, याची चौकशी होणार आहे.
तसेच कचऱ्याचे ढीग वाढत जाऊन त्याचा डोंगर तयार होत असताना संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांनी दुर्लक्ष केले का, याचाही तपास चौकशी समितीकडून केला जाणार आहे. या चौकशीत नेमके कोण दोषी ठरणार आणि पुढे कोणावर कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.