Minor mineral Overloaded: मुद्धी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाच्या ओव्हरलोड हायवा टिप्परचा बेफाम वेग पुन्हा एकदा समोर आला असून भरधाव धावणाऱ्या टिप्परने पुर्णा शहर
परभणी (Minor mineral Overloaded) : समुद्धी महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाच्या ओव्हरलोड हायवा टिप्परचा बेफाम वेग पुन्हा एकदा समोर आला असून भरधाव धावणाऱ्या टिप्परने पुर्णा शहराजवळील ताडकळस टि पॉईन्ट परिसरातील रस्ता दुभाजकाला जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दुभाजकासह वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर समृद्धी महामार्गाच्या कामावरील टिप्परचालकांचा वाढता उपद्रव आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेवरती संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत महसूल,पोलीस,आरटीओ प्रशासनाची हतबलता की लांगुलचालन आहे.असा सवाल उपस्थित होत आहे.पुर्णा परिसरात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी खदानीतून मुरूम घेऊन झिरो फाटा रस्त्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या हायवा टिप्पर क्र.एमएच-२६ सि. वाय.-५५५६ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सूटल्याने मध्यरात्रीच्या सुमारास टि पॉईन्ट वरील दुभाजकाला धडक बसली.अपघाताचा आवाज मोठा झाल्याने परिसरातील नागरिक घटना स्थळी धावले.
विशेष म्हणजे याच ताडकळस टि पॉइन्ट परिसरात मागच्या आठ दिवसांत भरधाव टिप्परच्या धडकेत दोन दुचाकीस्वाराना आपला जीव गमवावा लागला आहे.गेल्या दीड वर्षापासून पुर्णा शहर व परिसरात महामार्गाच्या कामावरील टिप्पर वाहनांना जणू २४ तासांचे मोकळे परवाने दिल्याप्रमाणे वागणूक मिळत असल्याचे दिसून येत आहे.या वाहनांना कायदा लागू नाही का ?ओव्हरलोड वाहतूक आणि बेफाम वेग असूनही कारवाई का होत नाही? संबंधित यंत्रणा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे यात सहभागी तर नाही ना ? असे संतप्त सवाल आता नागरिकांकडून खुलेआम उपस्थित केले जात आहेत.
समुद्धी महामार्गाचे काम सुरू असून परिसरातील खदानीतून दिवस-रात्र मोठया प्रमाणावर (Minor mineral Overloaded) गौण खनिजाची वाहतूक सुरू आहे.अनेक टिप्पर ओव्हर लोड अवस्थेत भरधाव वेगाने धावत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळते. याउलट सामान्य नागरिकांना घरबांधणीसाठी रेती,गिट्टी किंवा मुरूम वाहतूक करताना पावती,वेळेचे बंधन आणि ओव्हरलोडच्या नावाखाली कारवाईला सामोरे जावे लागते.सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाते. मात्र समृद्धी दरम्यान वारंवार घडणाच्या अपघाता नंतरही प्रशासन जागे होत नसल्याने एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच कारवाई होणार का?असा प्रश्न उपस्थित होत असून ओव्हरलोड टिप्परवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.