Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

Malkapur Rain

मलकापूरवर अस्मानी संकट; ३१ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, पण केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे गायब!

गेल्या दोन दिवसांपासून मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात झालेल्या धुवांधार, अतिवृष्टीसदृश पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे.


मलकापूरवर अस्मानी संकट ३१ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त पण केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे गायब

रावेर मतदारसंघातून विक्रमी मताधिक्य देणाऱ्या मलकापूरकरांच्या दुःखावर फुंकर घालण्यास लोकप्रतिनिधींना वेळ मिळेना; जनतेतून तीव्र संताप

मलकापूर : गेल्या दोन दिवसांपासून मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात झालेल्या धुवांधार, अतिवृष्टीसदृश पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. तालुक्यातील तब्बल ३१ हजार ३९९ हेक्टर क्षेत्रावरील उभी पिके पाण्याखाली गेल्याने हजारो शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतात आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा भीषण अस्मानी संकटाच्या काळात बाधित भागाची साधी पाहणी करणे, तात्काळ पंचनाम्याचे आदेश देणे किंवा नुकसानीच्या गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे, यासाठी रावेर मतदारसंघाच्या खासदार तथा केंद्रीय क्रीडामंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांना वेळ मिळालेला नाही. लोकप्रतिनिधींच्या या अशा संवेदनशील भूमिकेमुळे आणि दुर्लक्षामुळे मलकापूरच्या जनतेतून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

विक्रमी मताधिक्य देणाऱ्या मतदारांवरच दुर्लक्षाची वेळ

रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षाताई खडसे यांना विजय मिळवून देण्यात मलकापूर-नांदुरा भागातील मतदारांचा अतिशय मोठा आणि सिंहाचा वाटा राहिला आहे. येथील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवून विक्रमी मताधिक्याने त्यांना संसदेत पाठवले आणि त्या केंद्रीय क्रीडामंत्री झाल्या. मात्र, आज जेव्हा हाच मतदार निसर्गाच्या कोपामुळे रस्त्यावर आला आहे, तेव्हा खासदार महोदयांचे दर्शनही दुर्मिळ झाले आहे.

"निवडणुकीत मतांचा पाऊस पाडणाऱ्या मलकापूरकरांवर जेव्हा आज पावसाने संकट आणले, तेव्हा लोकप्रतिनिधींची साधी सहानुभूतीही पाहायला मिळत नाही," असा उद्विग्न सवाल आता स्थानिक नागरिक आणि शेतकरी विचारत आहेत.

तालुक्यात अतोनात नुकसान; ३१ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

वृत्तानुसार, तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या धुवांधार पावसामुळे नळगंगा आणि काळगंगा नद्यांना पूर आला आहे.

बाधित पिके:

  • सोयाबीन – १०,७१८ हेक्टर
  • कापूस – ९,९९५ हेक्टर
  • मका – ५,०१० हेक्टर
  • तूर – ६,२२६ हेक्टर

यासह एकूण ३१,३९९ हेक्टरवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बाधित गावे:
मलकापूर, जांभूळधाबा, नरवेल, धरणगाव व दाताळा महसूल मंडळातील ७८ गावांतील २९ हजार ४०९ शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रभावित झाले आहेत.

शहरातही मोठे नुकसान

मलकापूर शहरातील अनेक सखल भाग तसेच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी आणि नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शासकीय यंत्रणा आपल्या जागी, पण राजकीय नेतृत्वाचा अभाव

स्थानिक तहसीलदार समाधान सोनवणे आणि तालुका कृषी अधिकारी ललित सूर्यवंशी यांनी प्रशासकीय स्तरावर सतर्कतेचे इशारे देत प्राथमिक नुकसानीचे अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, प्रशासनाला गती देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना तातडीने विशेष आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी मैदानात उतरणे गरजेचे होते.

शेतकऱ्यांचे डोळे अश्रूंनी भरले आहेत, उभ्या पिकांची नासाडी झाली आहे, परंतु केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे यांनी साधी पाहणी करण्याचीही तत्परता दाखवली नाही, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेमुळे मलकापूरच्या राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला असून, "आमच्या मतांवर मंत्री झालेल्यांना आमचे दुःख दिसत नाही का?" असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Related to this topic: