Etapalli Teak Smuggling: एटापल्ली वनपरिक्षेत्रातील मोहुर्ली उपवन क्षेत्रात वन विभागाने सागवान तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई करत सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पुष्पा' स्टाईलने सागवान तस्करीचा प्रयत्न फसला; १५ ते १६ संशयित फरार
एटापल्ली/ गडचिरोली (Etapalli Teak Smuggling) : एटापल्ली वनपरिक्षेत्रातील मोहुर्ली उपवन क्षेत्रात वन विभागाने सागवान तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई करत सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २८ जुलै २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईची माहिती आता समोर आली असून, त्यामुळे सागवान तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, Aझ्२९ ऊA६९५४ क्रमांकाचा टाटा ट्रक मोठ्या प्रमाणात सागवान लाकूड घेऊन जात असल्याची माहिती वनरक्षक राकेश मडावी यांना मिळाली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी नीलिमा खोब्रागडे यांनी वन कर्मचार्यांच्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रक ताब्यात घेतला.
कारवाईनंतर जप्त ट्रक वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे आणत असताना जंगलातील चिखलमय रस्त्यात अडकला. सलग अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर २ ऑगस्ट रोजी ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले. त्यानंतर ट्रकमधील सागवान लाकडाचा पंचनामा करण्यात आला. प्राथमिक अंदाजानुसार जप्त लाकूड आणि वाहनासह मुद्देमालाची किंमत ५० ते ६० लाख रुपयांच्या घरात असल्याचे वन विभागाने सांगितले.
या (Etapalli Teak Smuggling) प्रकरणात १५ ते १६ संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर आली असून, त्यांचा शोध सुरू आहे. या तस्करीमागील संपूर्ण रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वन विभागाने व्यक्त केली आहे. प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या धडक कारवाईत वनरक्षक सचिन एल. तोराम, अर्जुन एल. वेडदा, कैलास डी. मडावी, अमर एम. कणाक्के, पुरुषोत्तम बी. सोयाम, सैनू के. हिच्यामी, डी. एस. हालाम, इरफा आत्राम आणि आरती उईके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
धान कोंड्याच्या पोत्यांआड लाकूड लपविण्याचा प्रयत्न
प्राथमिक तपासात सागवान लाकूड धान कोंड्याच्या पोत्यांमध्ये लपवून वाहतूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चित्रपटातील 'पुष्पा' शैलीप्रमाणे तस्करी करण्याचा हा डाव वन विभागाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. या (Etapalli Teak Smuggling) प्रकरणातील फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी वन विभागाने मोहीम तीव्र केली असून, तस्करीच्या साखळीतील इतर संबंधितांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.