शहरात घरगुती गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेबाबत अनियमितता व अपुऱ्या सुविधांबाबत नागरिकांकडून तक्रारी समोर आल्यानंतर पुरवठा विभागाने २८ मार्च शनिवारी संबंधित गॅस एजन्सीची पाहणी करून लेखी पंचनामा केला.
एजन्सींना नियमपालनाचे निर्देश
सेनगाव (LPG Distribution Issue) : शहरात घरगुती गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेबाबत अनियमितता व अपुऱ्या सुविधांबाबत नागरिकांकडून तक्रारी समोर आल्यानंतर पुरवठा विभागाने २८ मार्च शनिवारी संबंधित गॅस एजन्सीची पाहणी करून लेखी पंचनामा केला. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना एजन्सीसमोर मोठ्या प्रमाणात रांगा लावाव्या लागत असून, वितरण प्रक्रियेत विलंब होत असल्याची बाब निदर्शनास आली. तसेच प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून जिल्ह्यात गॅसचा तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात बुकिंग व वितरण प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याचे ग्राहकांनी नमूद केले. याशिवाय, गॅस एजन्सीकडून दर्शनी भागात साठा, बुकिंग स्थिती व प्राधान्यक्रम (सिनिऑरिटी) यादी प्रदर्शित करणे बंधनकारक असताना संबंधित नियमांचे पालन होत नसल्याचेही आढळून आले. शहरातील एका गॅसच्या सब-डिलरकडे नियमित पुरवठा न झाल्याने काही दिवसांपासून ग्राहक प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. मुख्य एजन्सी व सब-डिलर यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत असल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप होत आहे.
तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल लोहटे यांनी सांगितले की, संबंधित एजन्सीला ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गॅसची जादा दराने विक्री किंवा कोणत्याही प्रकारची आर्थिक अनियमितता आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पंचनाम्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर प्रकरणामुळे गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून, प्रशासनाने यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.