सन २०२४-२५ अंतर्गत राबविण्यात आलेल्या नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत झालेल्या विकास कामांची संपूर्ण संचिका उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक गणेश गवारे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली.
लातूर (Latur Municipal Corporation) : सन २०२४-२५ अंतर्गत राबविण्यात आलेल्या नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत झालेल्या विकास कामांची संपूर्ण संचिका (फाईल) उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेवक गणेश गवारे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र, संबंधित संचिका "मिळून येत नाही" असे लेखी उत्तर महापालिका प्रशासनाने दिल्याने प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सार्वजनिक निधीतून कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत असताना त्यासंबंधीची मूळ संचिकाच उपलब्ध नसल्याचे उत्तर देणे धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक गणेश गवारे यांनी व्यक्त केली आहे. संबंधित संचिकेमध्ये प्रशासकीय मंजुरी, अंदाजपत्रके, कार्यादेश, मोजमाप पुस्तिका, देयकांची माहिती आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे असणे अपेक्षित असते. अशा परिस्थितीत संचिकाच उपलब्ध नसल्याने विकास कामांच्या पारदर्शकतेबाबत संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महापालिकेच्या दप्तर व्यवस्थापनातील हा गंभीर प्रकार असल्याची चर्चा शहरात सुरू असून, सार्वजनिक निधीशी संबंधित महत्त्वाच्या नोंदीच उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणावर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते आणि संचिका शोधून काढण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
या प्रकाराची सखोल चौकशी करून संचिका नेमकी कोठे आणि कशी गायब झाली, याची जबाबदारी निश्चित करावी. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून संबंधित संचिका तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गणेश गवारे यांनी केली आहे. जबाबदारी निश्चित न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.