Public Works Corruption: जि प च्या बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे मुद्दे चव्हाट्यावर आणले. जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा
अफजल मोमीन
लातूर (Public Works Corruption) : लातूर जिल्हा परिषदेतील प्रशासक राजवट संपुष्टात आल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष कारभार सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक बैठका कोणत्याही ठोस आणि प्रभावी निर्णयाविना पार पडत होत्या. यामुळे अनेक विकासकामे रखडली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला मोठी गती मिळेल या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या पहिल्याच जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत जलजीवन मिशन व जि प च्या बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराचे मुद्दे चव्हाट्यावर आणले. जि.प. अध्यक्षा उषाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.
जलजीवन मिशनचा (Public Works Corruption) उडालेला बोजवारा आणि सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विषयावर चर्चा करण्याचा मुद्दा गाजला. जिल्ह्यात झालेल्या व चालू असलेल्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत सदस्यांनी उत्तरे मागितली. मात्र अध्यक्ष, सचिवांनी संबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे उत्तर दिले. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा, आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरवस्था झाल्याचीही ओरड सदस्यांनी केली.
प्रशासकाचा कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. शिक्षण विभागातील तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्या चौकशी संदर्भातही जिल्हा स्तरावर एक चौकशी समिती गठीत करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी सदस्यांनी केली. यावेळी विभागाच्यावतीने चौकशी सुरू असल्याचे सीईओ राहूलकुमार मिना यांनी सांगितले. यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या दुरूस्ती बाबतीत अव्वाच्या सव्वा खर्चावरूनही काँग्रेसच्या गटनेत्या आशाताई भिसे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची हमी जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई तळेगावकर यांनी दिली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्षा उषाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ७ जुलै रोजी ही सर्वसाधारण सभा रात्री उशिरापर्यंत चालली.