कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा निर्णय; प्रवासी सुविधा, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणार चालना
कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना अधिकृत थांबा देण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे कोकणातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम होण्याबरोबरच प्रवाशांच्या प्रवासातही मोठी सुविधा निर्माण होणार आहे.
या संदर्भातील माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे कळवली. मुख्यमंत्र्यांनी २५ मार्च २०२४ रोजी सावंतवाडी रोड स्थानकावर या गाड्यांना थांबा देण्याची विनंती केली होती. त्या मागणीचा विचार करून जनहिताच्या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. सावंतवाडी रोड स्थानकावर या गाड्यांचा थांबा मंजूर झाल्यामुळे कोकणातील नागरिकांना मोठा फायदा होणार असून रेल्वे प्रवास अधिक सुलभ होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, या निर्णयामुळे कोकणातील रेल्वे नेटवर्क अधिक बळकट होईल. तसेच पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक व्यापार आणि आर्थिक घडामोडींनाही गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा मिळालेल्या गाड्या
रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या तीन गाड्यांमध्ये खालील रेल्वे सेवांचा समावेश आहे:
- गाडी क्रमांक 12133/12134 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मंगळुरू एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 12431/12432 तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 12201/12202 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नॉर्थ (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने मिळणाऱ्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सावंतवाडी रोड स्थानकावर या गाड्यांना थांबा मिळाल्यामुळे सिंधुदुर्ग तसेच परिसरातील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासासाठी अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहेत. यामुळे कोकणातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच या भागाच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.