Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर

Khalil Shaikh

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरण; माजी आमदार रवींद्र धंगेकर, पत्नींसह १४ जणांविरोधात गुन्हा

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तथा लेबर कॉन्ट्रॅक्टर खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे.


पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरण माजी आमदार रवींद्र धंगेकर पत्नींसह १४ जणांविरोधात गुन्हा

Khalil Shaikh |

आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ आणि सुसाईड नोट तपासाच्या केंद्रस्थानी; अडीच कोटी रुपयांची येणे बाकी असल्याचा उल्लेख

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तथा लेबर कॉन्ट्रॅक्टर खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह एकूण १४ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येपूर्वी खलील शेख यांनी तयार केलेला व्हिडिओ आणि लिहून ठेवलेली सुसाईड नोट तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गुरुवारी गुलटेकडी परिसरातील राहत्या घरी खलील शेख यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून कर्जबाजारीपणामुळे आयुष्य संपविण्याचा निर्णय घेत असल्याचे नमूद केले होते. त्याचबरोबर काही व्यक्तींमुळे आर्थिक अडचणी वाढल्याचाही आरोप त्यांनी केला होता.

घटनास्थळी दोन चिठ्ठ्या सापडल्या

पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, खलील शेख यांनी ज्या इमारतीत आत्महत्या केली, त्या इमारतीच्या बाहेर एक चिठ्ठी चिकटविण्यात आली होती. तसेच त्यांच्या खिशात आणखी एक चिठ्ठी आढळून आली. दोन्ही चिठ्ठ्या ताब्यात घेतल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.

यानंतर खलील शेख यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून स्वारगेट पोलीस ठाण्यात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

२०११ पासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत

खलील शेख हे २०११ पासून पुण्यात बांधकाम क्षेत्रात कार्यरत होते. ते संबंधित आरोपींकडे सेंट्रिंगचे काम करत होते. हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी बाहेरून व्याजाने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. संबंधितांकडून व्याजासह पैसे परत देण्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने ते गंभीर आर्थिक तणावात असल्याचे तपासात समोर आले आहे.

सुसाईड नोटमध्ये अडीच कोटी रुपयांचा उल्लेख

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, खलील शेख यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत अडीच कोटी रुपये येणे बाकी असल्याचा उल्लेख केला आहे. या आर्थिक व्यवहारांचा तपास केला जाणार असून कोणाकडे किती रक्कम येणे किंवा देणे आहे, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

उत्कर्ष असोसिएट फर्मचीही चौकशी

या प्रकरणात उत्कर्ष असोसिएट या फर्मचे नाव समोर आले आहे. या संस्थेमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, बाळा शेडगे यांच्या पत्नी तसेच रघू गौडा यांच्या पत्नी भागीदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मृताच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, भागीदारी नावापुरती असली तरी व्यवहारांमध्ये रवींद्र धंगेकर यांची भूमिका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रवींद्र धंगेकर यांचे स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीने २०२५ मध्ये संबंधित कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीचे आर्थिक व्यवहार आपण सांभाळत नव्हतो. सर्व भागीदार आर्थिक संकटात सापडले असून न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील प्रकल्प वादाच्या केंद्रस्थानी

या प्रकरणामागे रविवार पेठेतील वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील बांधकाम प्रकल्पाचा वाद असल्याची माहिती समोर आली आहे. या जमिनीवर उत्कर्ष असोसिएटकडून इमारतीचे बांधकाम सुरू होते. मात्र, न्यायालयीन स्थगितीमुळे प्रकल्प रखडला. त्यामुळे बँकेचे कर्ज फेडता आले नाही आणि आर्थिक संकट निर्माण झाल्याचा दावा रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

मात्र, खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओत आणि सुसाईड नोटमध्ये रवींद्र धंगेकर आणि बाळा शेडगे यांनी सुमारे ५० लाख रुपये न दिल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप केला होता.

तपास सुरू

या प्रकरणातील व्हिडिओ, सुसाईड नोट, आर्थिक व्यवहार, भागीदारी आणि संबंधित सर्व व्यक्तींची भूमिका यांचा सखोल तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत. पोलिसांनी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे स्पष्ट करत तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Related to this topic: