Farmers subsidy Scam: २०२४ च्या अतिवृष्टीत खरडलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आलेला अनुदान ६ लाख १५ हजार रुपराशी फसवणूक करून मंजूर झाला असल्याचे कळले.
सहायक कृषी अधिकाऱ्या वर रात्री गुन्हा दाखल
आखाडा बाळापूर (Farmers subsidy Scam) : अतिवृष्टीमुळे शेतजमीन पिकांसह खरडून तीन गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते परंतु नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीऐवजी भलत्याच लोकांना मदत अनुदान वाटप घोटाळा फसवणूक केल्याची बाब उघड झाली ज्यामध्ये कळमनुरी तालुक्यातील तीन गावातील शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर २०२४ च्या अतिवृष्टीच्या खरडणी अनुदानातील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे.
याप्रकरणी कळमनुरीचे सहायक कृषी अधिकारी एस. एस. संगमवार यांच्यावर आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री कळमनुरी तहसीलदार जीवकुमार कांबळे फौजदारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी, कृष्णापूर तर्फे शेवाळा आणि परिसरातील गावांना २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी खरडणीचे अनुदान मंजूर झाले होते. पण वाटपाच्या वेळी नियम धाब्यावर बसवण्यात आले. तक्रारदार शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ज्यांच्या नावे सातबारा नाहीत अशांना अनुदान दिले. कमी जमीन असलेल्याना जास्त रक्कम मंजूर केली. शेतकरी एका गावचा आणि शेती दुसऱ्या गावात दाखवून पैसे लाटले यात अनेक लाभार्थी शेतकरी नाही असा आरोप या तीन गावातील शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एकूण ६ लाख १५ हजार ७०० रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीत समोर आले. प्रथम कळमनुरी तालुक्यातील पिंपरीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तहसील कार्यालयाला चौकशीचे आदेश दिले. तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांनी स्थापन केलेल्या समितीने संगमवार दोषी असल्याचे स्पष्ट केले.
पुराव्या आधारे अखेर तहसीलदारांनीच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या (Farmers subsidy Scam) प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते तपास करत आहेत. पोलिसांनी अनुदानाची मंजूर यादी, सातबारा उतारे आणि ज्या बँक खात्यांमध्ये पैसे गेले त्याचा तपशील मागवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असू शकतो. संगमवार यांच्या सखोल चौकशीतून संपूर्ण रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.
या (Farmers subsidy Scam) प्रकरणी शेतकरी तक्रार पाठपुराव्यामुळे झालेल्या चौकशीमध्ये दोषी ठरलेल्या सहायक कृषी अधिकारी एस. एस. संगमवार यांनी अपहार रक्कम म्हणून दोन टप्प्यांत पैसे जमा केले आहे असं सूत्रांनी सांगितले. यात कृष्णापूर येथील काही व्यक्तींना शासकीय रक्कम वाटल्याप्रकरणी १ लाख ५२ हजार २८० रुपये व पिपरी गावात काही लोकांना वाटलेल्या रक्कमेपैकी २ लाख ९६ हजार २८० रुपये असे दोन्ही मिळून ३ लाख ६९ हजार ५६० रुपये जमा केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्राम महसूल अधिकाऱ्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित
प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र दाखवून अतिरिक्त अनुदान वितरीत करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सहायक कृषी अधिकारी एस. एस. संगमवार यांनी शासकीय कामकाजात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय या प्रकरणातील ग्राम महसूल अधिकारी (आखाडा बाळापूर सज्जा) एकनाथ कदम यांच्या विरुद्ध ही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून नियमानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली आहे.