Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > मराठवाडा > छत्रपती संभाजीनगर

Kadepathar Khandoba Temple

कडेपठारावरील ऐतिहासिक खंडोबा मंदिराचे जतन होणार? राज्य पुरातत्त्व विभागाचा संवर्धनाचा प्रस्ताव सादर

सातारा डोंगरावरील कडेपठार परिसरात असलेल्या प्राचीन खंडोबा मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य पुरातत्त्व विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.


कडेपठारावरील ऐतिहासिक खंडोबा मंदिराचे जतन होणार राज्य पुरातत्त्व विभागाचा संवर्धनाचा प्रस्ताव सादर

Kadepathar Khandoba Temple |

ऐतिहासिक वारसा जतनासाठी महत्त्वाचे पाऊल; हेमाडपंती त्रिदल शैलीतील मंदिराच्या पुनरुज्जीवनाची आशा

छत्रपती संभाजीनगर (Kadepathar Khandoba Temple) : सातारा डोंगरावरील कडेपठार परिसरात असलेल्या प्राचीन खंडोबा मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य पुरातत्त्व विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंदिराच्या संवर्धनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो लवकरच पालकमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या ऐतिहासिक वारशाच्या पुनरुज्जीवनाची आशा निर्माण झाली असून भाविक, इतिहास अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सातारा गावातील प्रसिद्ध खंडोबा मंदिर हे राज्य पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित वारशामध्ये समाविष्ट असून, तेथे विभागाने यापूर्वीच संवर्धनाची कामे हाती घेतली आहेत. मंदिर परिसरात आकर्षक सभामंडपाची उभारणी करण्यात आली असून इतर जतनाची कामेही सुरू आहेत. मात्र, या मंदिरापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेले कडेपठारावरील खंडोबा मंदिर अधिक प्राचीन असल्याचे इतिहास अभ्यासकांचे मत आहे.

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे खंडोबा, म्हाळसादेवी आणि बाणू यांच्या एकत्रित मूर्ती असल्याचे सांगितले जाते. अशा प्रकारची मूर्ती अन्यत्र क्वचितच आढळते. या मंदिराचा उल्लेख निजामकालीन नोंदींमध्येही आढळत असल्याने त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधिक अधोरेखित होते.

कडेपठार परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला असून दरवर्षी पौष महिन्यात चंपाषष्ठीनंतरच्या तिसऱ्या रविवारी येथे मोठी यात्रा भरते. या ठिकाणी जाण्यासाठी अद्याप व्यवस्थित रस्त्याची सुविधा नसली, तरी भाविक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात. मात्र, अपुऱ्या सुविधा आणि संवर्धनाच्या अभावामुळे हे ऐतिहासिक मंदिर पर्यटकांच्या नजरेपासून दूर राहिले आहे.

सध्या मंदिराची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली असून परिसरात प्राचीन अवशेष विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. मूळ वास्तूचा बहुतांश भाग नष्ट झाला असून केवळ सभामंडपाचा काही भाग शिल्लक आहे. मंदिराच्या विस्तीर्ण रचनेवरून पूर्वी ही वास्तू अत्यंत भव्य असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. याच पार्श्वभूमीवर भाविक, इतिहास संशोधक आणि लोकप्रतिनिधींनी सातत्याने संवर्धनाची मागणी केली होती.

राज्य पुरातत्त्व विभागाच्या संरक्षित वारशाच्या यादीत या मंदिराचा समावेश नसतानाही विभागाने या स्थळाची पाहणी करून त्याच्या ऐतिहासिक मूल्याची दखल घेतली आहे. त्यानंतर मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो पालकमंत्र्यांकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. त्यामुळे संवर्धन प्रक्रियेला अधिकृत दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार, कडेपठारावरील खंडोबा मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीतील असून त्यात त्रिदल रचनेची वैशिष्ट्ये दिसून येतात. बीड येथील कंकालेश्वर, केसापुरीचे मंदिर आणि महालक्ष्मी मंदिराप्रमाणे या मंदिरातही तीन गर्भगृहे असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मंदिराची सीमाभिंत पाहता दोन्ही बाजूंनी प्रवेशद्वार असण्याची शक्यता असल्याचेही अभ्यासकांचे मत आहे.

मंदिराच्या बांधकामासाठी परिसरातील स्थानिक दगडाचा वापर करण्यात आला असावा, असे पुरातत्त्व विभागाचे निरीक्षण आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेली पुष्करणी (बारव) नैसर्गिक उतारावरील पाणी साठवण्यासाठी तयार करण्यात आली असावी. तसेच मंदिरासमोरील घटपल्लव शैलीतील स्तंभ त्या काळातील समृद्ध स्थापत्यकलेची साक्ष देतात.

संवर्धनाचा प्रस्ताव पुढे सरकल्यामुळे या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचे जतन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, भविष्यात कडेपठारावरील खंडोबा मंदिर पर्यटन आणि इतिहास अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र ठरू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: