Nagpur Smart Meter: महावितरणकडून राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेविरोधात वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कार्यरत असलेले जुने डिजिटल मीटर अतिशय सुस्थितीत असतानाही
स्मार्ट मिटर हटवा, जुनेच मिटर बसवा
बुटीबोरी येथे महावितरणविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा
संदीप बलवीर
नागपूर (Nagpur Smart Meter) : महावितरणकडून राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेविरोधात वीज ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कार्यरत असलेले जुने डिजिटल मीटर अतिशय सुस्थितीत असतानाही, ग्राहकांची कोणतीही पूर्वसंमती न घेता किंवा पूर्वसूचना न देता रात्रीत स्मार्ट मीटर बसवण्याचा धडाका महावितरणने सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर, बुटीबोरी परिसरातील संतप्त वीज ग्राहकांनी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व सातगाव (वेना) चे माजी सरपंच योगेश सातपुते (पाटील) यांच्या नेतृत्वात महावितरणच्या हुकूमशाही कारभाराविरोधात दंड धोपटले असून, 'स्मार्ट मीटर हटवा, जुने मीटरच बसवा' अशी एकमुखी मागणी करत तीव्र जणआंदोलनाचा इशारा दिला आहे.
'स्मार्ट मीटर' की ग्राहकांच्या खिशावर दरोडा?
बुटीबोरी, सातगाव (वेना) येथील स्थानिक नागरिकांच्या मते, हे स्मार्ट मीटर नसून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर महावितरणने टाकलेला उघड दरोडा आहे. ज्या घरात पूर्वी मासिक वीज बिल ८०० ते १,००० रुपये येत होते, तिथे हे नवीन मीटर लागल्यापासून कोणतीही अतिरिक्त उपकरणे न वापरता बिल थेट ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे.हेच काय तर बुटीबोरी येथील इरफान शेख यांच्या घरी ५०० ते ७०० रुपये वीज बिल येत असतांना त्यांना अचानक २६ हजार रुपये वीज बिल आल्याने व वीज बिलात झालेल्या या दुपटी-तिपटीच्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि गरिबांचे घरगुती आर्थिक बजेट पार कोलमडून गेले आहे. "अत्यल्प वापर असतानाही एवढी अवाढव्य बिले कशी काय येऊ शकतात? महावितरणची ही बिलिंग प्रणाली आणि रीडिंग यंत्रणा पारदर्शक नसून अत्यंत संशयास्पद आहे," असा आरोप आंदोलक नागरिकांनी केला आहे.
सक्तीच्या कारवाईमुळे वीज ग्राहकांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारने विधानसभेत (Nagpur Smart Meter) स्मार्ट मीटरची कोणतीही सक्ती केली जाणार नाही, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात महावितरणचे अधिकारी आणि कंत्राटदार हे पोलिसी खाक्या दाखवत किंवा ग्राहकांच्या अनुपस्थितीत जबरदस्तीने मीटर बदलत असल्याच्या तक्रारी बुटीबोरीत वाढल्या आहेत. ग्राहकांच्या हक्कांची आणि अधिकारांची पायमल्ली करून राबवली जाणारी ही मोहीम पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.
आंदोलकांचे मुख्य आक्षेप आणि मागण्या:
जुने मीटर पुन्हा बसवा: सध्याचे नवीन वादग्रस्त स्मार्ट मीटर (Nagpur Smart Meter) त्वरित काढून आधीचेच डिजिटल मीटर पूर्ववत बसवण्यात यावेत.
सक्तीची वसुली थांबवा: जोपर्यंत या मीटरच्या अचूकतेची आणि तांत्रिक त्रुटींची स्वतंत्र त्रयस्थ पक्षाकडून तपासणी होत नाही, तोपर्यंत वाढीव बिलांची सक्तीची वसुली थांबवावी.
पूर्वसंमती अनिवार्य करा: कोणत्याही ग्राहकाच्या आवारात मीटर बदलण्यापूर्वी त्याची लेखी संमती मिळवणे कायदेशीररीत्या सक्तीचे करावे.
बुटीबोरी येथे जणआंदोलनाचा इशारा:
महावितरणच्या या वाढत्या मनमानी कारभाराला चोख उत्तर देण्यासाठी बुटीबोरी येथील मुख्य चौकात भव्य निषेध आंदोलन छेडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. स्थानिक नागरिकांसह धर्मवीर संभाजी महाराज बहुउद्देशीय सामाजिक संघटनाचे अध्यक्ष योगेश सातपुते (पाटील) व सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकरे या आंदोलनात सहभागी होणार आहेत. जर महावितरणने तातडीने आपली दडपशाही थांबवून (Nagpur Smart Meter) नवीन मीटर बसवण्याची मोहीम स्थगित केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा कडक इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे महावितरण प्रशासनच जबाबदार राहील असेही त्यांनी सांगितले.
मिटर ही महावितरण ची मालमत्ता आहे. त्यामुळे ग्राहकाकडे असलेले जुने डिजिटल मिटर काढून आम्ही स्मार्ट मिटर लावू शकतो, त्याकरिता आम्हाला ग्राहकांची परवानगी घ्यायची गरज नाही.
-योगेश विटणकर, पी आर ओ, महावितरण