Ghota Devi Youth Death: देवी शिवारातील गावातील दोन युवकांनी कयाधू नदीच्या पात्रात बेलजोडी धुण्याने दुरलगावले. नदीत रेताचा उत्खननामुळे खड्ड्यात साचलेल्या गाळामुळे त्यांना मृत्यू झाला.
घोटा देवी शिवारातील घटना; गावावर पसरली शोककळा
हिंगोली (Ghota Devi Youth Death) : तालुक्यातील घोटा देवी येथील दोन युवक रविवारी दुपारच्या सुमारास कयाधू नदी पात्रामध्ये बैलजोडी धुण्याकरीता गेले होते. नदी पात्रातील रेती उत्खननामुळे साचलेल्या खड्ड्याच्या गाळामध्ये अडकून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. दोघांच्या मृतदेहावर रविवारी रात्रीच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथील गणेश अर्जुन पावडे (१७) व कृष्णा बालाजी अटक (१७) हे दोघेही बारावीमध्ये शिक्षण घेत होते. १२ जुलै रविवार रोजी सकाळच्या सुमारास त्यांनी बैलजोडीसह गाय, वासरू, शेळी चारण्याकरीता घेऊन गेले होते. कयाधू नदीच्या परिसरात आले असता ते दोघेही बैलजोडी धुण्याकरीता नदी पात्रात उतरले. बैलजोडी धूत असताना नदी पात्रात उन्हाळ्यामध्ये झालेल्या रेती उत्खननाने खड्ड्यात साचलेल्या गाळाचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. दोघांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला परंतु गाळात फसुन त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी शेळ्या घरी आल्याने त्यांच्या सोबत कोणीही नसल्याचे पाहून घरच्यांनी शोध मोहीम सुरू केली.
यावेळी नदी पात्राजवळ बांधलेली गाय व दोघांचे कपडे, मोबाईल व चपला दिसून आल्या. त्यामुळे काही जणांनी नदी पात्रात शोध मोहीम सुरू केली. सायंकाळच्या सुमारास मृतदेह हाती लागल्याने नदी पात्रातून मृतदेह पाण्याबाहेर काढताच त्यांच्या कुटूंबीयांनी हंबरडा फोडला. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली. रात्रीच्या सुमारास येथील स्मशानभूमिमध्ये दोघांवर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आला. गणेश पावडे याच्या पश्चात आई -वडील, दोन मोठे भाऊ, भावजय, पाच बहिणी, भाऊजी असा परिवार आहे. कृष्णा अटक याच्या पश्चात आई - वडील, एक भाऊ असा परिवार आहे.
मयत गणेश पावडे व कृष्णा अटक या दोघांची जीवलग मैत्री
घोटा देवी (Ghota Devi Youth Death) येथील कृष्णा बालाजी अटक व गणेश अर्जुन पावडे हे दोघेही एका वयाचेच असुन जीवलग मित्र म्हणुन गावामध्ये परिचित होते. कुठेही हे दोघेच दिसून येत होते. रविवारी दुपारच्या सुमारास कयाधू नदीच्या पात्रात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली होती.