प्रा. ओम बोलोदे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी ३ ऑगस्ट रोजी गट विकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांना निवेदन सादर केले.
पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे हप्ते तात्काळ वितरित करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
मानोरा : मानोरा तालुक्यात घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत तसेच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचे थकीत हप्ते तात्काळ जमा करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रा. ओम बोलोदे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी ३ ऑगस्ट रोजी गट विकास अधिकारी ज्योती राजपुरोहित यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील काही अधिकारी एजंटांच्या माध्यमातून घरकुलाचे हप्ते मंजूर करण्यासाठी गरजू लाभार्थ्यांकडून सर्रास पैशांची मागणी करत असल्याचे समोर येत आहे. गोरगरीबांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतील निधीपैकी जवळपास ३० टक्के रक्कम कमिशनच्या स्वरूपात खर्च होत असल्याची तालुक्यात जोरदार चर्चा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कमिशन दिल्याशिवाय कोणताही हप्ता मंजूर केला जात नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जे लाभार्थी कमिशन देत नाहीत, त्यांचे काम पूर्ण होऊनही त्यांचे पेमेंट मुद्दाम रोखून ठेवले जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना डावलून कमिशनच्या मोबदल्यात बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, मोदी आवास, पंतप्रधान आवास आणि रमाई आवास योजनांच्या निकषांचे उल्लंघन करून काही लाभार्थ्यांना दुहेरी घरकुल मंजूर करण्यात येत असल्याचे चित्र दिसत असून शासनाच्या नियमांची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घरकुलाचे हप्ते मिळवून देण्यासाठी दलालांमार्फत मोठ्या प्रमाणात पैशांची मागणी केली जात असल्याची चर्चा असून, या प्रकारामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. अधिकारी, कर्मचारी आणि दलाल यांच्या संगनमताने दुहेरी घरकुल मंजूर करणे तसेच कमिशन न देणाऱ्या पात्र लाभार्थ्यांचे हप्ते रोखून धरणे हे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे लक्षण नाही का, असा सवालही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित निधी जमा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून, यासाठी प्रा. ओम बोलोदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी श्याम पवार, देवा बारसे, रामनाथ राठोड, नितेश लवटे, महेश राऊत, राम राऊत, वैभव गावंडे, सतीश राठोड, महेश राठोड, अशोक मनवर, सुनील चव्हाण, रामेश्वर चव्हाण यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि पात्र लाभार्थी उपस्थित होते.