Hingoli Revenue Division: हिंगोली जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी नेतृत्व आणि निष्णातता दाखवून राज्य स्तरावर आग्रेज क्रम मिळवले. आरटीएस, विशेष संखोल पुनरिक्षण मोहिम
आरटीएस व विशेष सखोल पुनरीक्षणात हिंगोली जिल्ह्याची राज्यात उल्लेखनीय कामगिरी
उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
हिंगोली (Hingoli Revenue Division) : महसूल विभाग हा प्रशासनाचा महत्त्वाचा कणा असून, विविध प्रश्न व जबाबदाऱ्या प्रभावीपणे हाताळण्याची क्षमता या विभागात आहे. महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रत्येक जबाबदारी निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पाडत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत (आरटीएस) प्रकरणांचा विहित मुदतीत निपटारा करून हिंगोली जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतही जिल्ह्याने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.श्रेणिक लोढा, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजूषा मूथा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरवदे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावरील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रत्येक कामाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून येणाऱ्या अडचणींवर मात करावी. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना त्यांनी भविष्यातही हिंगोली जिल्ह्याची कामगिरी राज्यासाठी आदर्श ठरेल, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच महसूल कर्मचाऱ्यांसाठी महसूल वसाहत उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेतून तसेच गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून विविध शासकीय कार्यालये सुसज्ज व अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास यश निश्चित – मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड म्हणाले की, लोकाभिमुख प्रशासनामध्ये क्षेत्रीय स्तरावर नागरिकांचे प्रश्न सोडविणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या चांगल्या कामाचे श्रेय शासनाला मिळते. काम करताना अनेक संकटे व अडचणी येतात; मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या अडचणींवर मात केल्यास यश निश्चित मिळते. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले विचार प्रगल्भ ठेवून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. हिंगोली जिल्ह्याने आरटीएस तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत केलेली उत्कृष्ट कामगिरी कौतुकास्पद आहे. जिल्हा परिषदेनेही ‘सेवाकर्मी’ तसेच ‘आयगॉट’ अंतर्गत कर्मयोगी भारत पुरस्कार मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
पुरस्कारामुळे काम करण्याची ऊर्जा वाढते – पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा
पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी महसूल दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, वर्षभर केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल महसूल दिनाच्या माध्यमातून घेतली जाते. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान हा त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन असून, त्यामुळे काम करण्याची ऊर्जा द्विगुणित होते. पुरस्कार प्राप्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवावी. तसेच पुरस्कार न मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी निराश न होता अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा, असे सांगून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कार्यपद्धती वाखाणण्याजोगी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महसूल विभागाने प्रतिष्ठा जपण्याचे काम केले – अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे
अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे म्हणाले की, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कौशल्याचा प्रभावी वापर करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आरटीएस आणि विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत हिंगोली जिल्ह्याने राज्यात अग्रक्रम मिळविला आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनातून, प्रामाणिक पाठपुराव्यामुळे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे.
‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या माध्यमातून करण्यात आलेली भरतीही पारदर्शक व निरपेक्ष पद्धतीने पार पाडण्यात आली. निष्काम भावनेने काम करणारा कर्मचारी हा खऱ्या अर्थाने महसूल रत्न ठरतो. महसूल विभागाने आपली प्रतिष्ठा जपण्याचे काम केले असून, हे यश संपूर्ण महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आहे. जनतेला न्याय देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी महसूल विभाग पार पाडत आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी केले, तर सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा यांनी केले. महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भूते, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे, नायब तहसीलदार विनोद डोणगावकर, लघुलेखक कैलास मठपती, सहायक महसूल अधिकारी अनिल पाथरकर, मंडळ अधिकारी आशा गिते, महसूल सहायक रविंद्रकुमार मस्के, ग्राम महसूल अधिकारी राहुल कोल्हे, वाहनचालक मारोती सिरसाट, शिपाई पवन यादव, महसूल सेवक केशव पलटनकर आणि पोलीस पाटील तरन्नूम शेख यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर, तहसीलदार सखाराम मांडवगडे, तहसीलदार हरीश गाडे यांच्यासह अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी तसेच महसूल विभागातील विविध स्तरांवरील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.