Hingoli Farmers' March: शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकर्यांना हिंगोलीत आणून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर
हिंगोलीतून रविकांत तुपकर यांचा शासन व प्रशासनाला इशारा
हिंगोली (Hingoli Farmers' March) : शेतकरी कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्यास संपूर्ण राज्यातील शेतकर्यांना हिंगोलीत आणून आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी हिंगोलीतून शासन व प्रशासन दोघांना दिला आहे.
हिंगोली जिल्ह्याचा भूमिपुत्र अभिजीत दिपके याने विद्यार्थ्यांना दिल्लीतील जंतर मंतर येथील आंदोलनासाठी हाक दिली आणि देशभरातील लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यामुळेच देशाच्या पंतप्रधानांना शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. हीच चळवळीची ताकद आहे असेही ते म्हणाले. आमदार तानाजीराव मुटकुळे यांना उद्देशून तुपकर म्हणाले की, आम्ही जर सुरुवात केली तर तुम्हाला झोप लागणार नाही. महाराष्ट्रात आम्ही अनेक साखर कारखानदारांचा माज उतरवला आहे.
दूध संघातील माजोरी लोकांनाही आम्ही जाब विचारला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या राजकीय वतनदार्या उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. आज या क्षणी हिंगोलीच्या विश्रामगृहावर देह सोडावा लागला तरी आम्ही तयार आहोत. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या आणि शेतकर्यांच्या पोरांच्या नादाला लागू नका. आमचे डोके फिरले तर तुम्हाला रस्त्यावर फिरणेही मुश्कील होईल असे तुपकर म्हणाले. यावेळी त्यांनी प्रशासनातील अधिकार्यांनाही इशारा दिला. जर आम्ही ठरवले तर तुमचे उत्पन्न, पगार आणि जमवलेली संपत्ती याची चौकशी लावू. चुकीच्या पद्धतीने तडीपारी केली तर याद राखा. उभ्या महाराष्ट्रातून हजारो शेतकरी हिंगोलीत आणू आणि जोपर्यंत तडीपारी रद्द होत नाही तोपर्यंत हिंगोलीचे मैदान सोडणार नाही. आम्ही हिंगोलीतून उठणारच नाही असे ते म्हणाले.
सध्या शेतकर्यांवर आणि कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोपही रविकांत तुपकर यांनी यावेळी केला. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील कावरखे यांच्यावर पोलीस प्रशासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये जबरी चोरी दरोडा बलात्कार असे कोणतेही गंभीर गुन्हे नसताना शेतकर्यासाठी केलेल्या आंदोलनात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून तडीपार करण्याबाबत जी नोटीस बजावलेली आहे ती नोटीस त्यांनी सन्मानपत्र म्हणून लॅमिनेशन करून घरामध्ये ठेवली आहे अशा नोटीसला आम्ही कदापिही घाबरणार नसल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे,प्रवीण मते , अशोक जयस्वाल, रमेश जाधव ,संजय मुळे, प्रवीण सोनटक्के, भागवत ढवळे, राजकुमार ढवळे, मनोहर सावके यांची उपस्थिती होती.