हिंगोली () : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी E-KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन E-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली यांनी 5 ऑगस्ट रोजी याबाबत जाहीर आवाहन केले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील एकूण 44 हजार 123 लाभार्थी शेतकऱ्यांची यादी 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील 27 हजार 117 शेतकऱ्यांनी आतापर्यंत E-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र अद्यापही 17 हजार 96 शेतकऱ्यांची E-KYC होणे बाकी आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रलंबित असलेल्या 17 हजार 96 शेतकऱ्यांपैकी 16 हजार 897 शेतकरी हे राष्ट्रीयकृत बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि इतर व्यापारी बँकांशी संबंधित आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यांच्या शाखांमधील लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युको बँक, आयसीआयसीआय बँक आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याशी संबंधित शेतकऱ्यांची E-KYC देखील प्रलंबित आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित बँकांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी तातडीने आपल्या लाभार्थी शेतकऱ्यांशी संपर्क साधावा आणि त्यांची E-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. जिल्हा उपनिबंधक सुरेखा ई. फुपाटे यांनी हे आवाहन केले असून शेतकऱ्यांनीही विलंब न करता E-KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.