Hingoli Police Dial 112: हिंगोली जिल्ह्यातील शासनाच्या आपत्कालीन सहाय्य प्रणाली 'डायल ११२' च्या लागू होण्यामुळे जुलै २०२६ मध्ये नागरिकांना तात्काळ मदत मिलली.
हिंगोली (Hingoli Police Dial 112) : महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल 112 च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हिंगोली जिल्हा पोलीस दलाने जुलै 2026 मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्याची कामगिरी केली आहे.
सप्टेंबर 2021 पासून राज्यात सुरू झालेल्या डायल 112 या एकात्मिक आपत्कालीन क्रमांकामुळे नागरिकांना पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन या तीनही सेवांसाठी एकाच क्रमांकावरून तातडीची मदत उपलब्ध झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ही प्रणाली कार्यरत असून जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा आणि अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात या प्रणालीच्या कामकाजावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
पोलीस नियंत्रण कक्षातून डायल 112 वर येणाऱ्या प्रत्येक कॉलची नोंद घेतल्यानंतर तातडीने संबंधित पोलीस ठाणे आणि ERV पथकाला माहिती दिली जाते. यामुळे घटनास्थळी जलद प्रतिसाद मिळणे शक्य झाले आहे. नियंत्रण कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून असतात.
जुलै 2026 मध्ये हिंगोली जिल्ह्यात डायल 112 वर (Hingoli Police Dial 112) एकूण 1029 कॉल प्राप्त झाले. या कालावधीत 308 महिलांना तातडीची मदत पुरवण्यात आली. रस्ते अपघातातील 29 जखमींना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच 46 चोरीच्या घटना, 29 रोड अपघात, 06 बेपत्ता व्यक्तींची प्रकरणे आणि 52 ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक ती मदत देण्यात आली. याशिवाय इतर 34 आपत्कालीन प्रकरणांमध्येही पोलीस पथकाने त्वरित दखल घेतली. अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी डायल 112 ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे या आकडेवारी वरून दिसून येते.
विशेष म्हणजे जानेवारी ते जून 2026 या कालावधीत घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याच्या कामगिरीत हिंगोली जिल्हा राज्यात 28 व्या क्रमांकावर होता. मात्र जुलै महिन्यात 63.33 टक्के प्रतिसाद दर नोंदवत हिंगोलीने थेट राज्यात अव्वल स्थान पटकावले. ही झेप नियंत्रण कक्षातील पथक, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि ERV वरील अंमलदार यांच्या समन्वय आणि कर्तव्यनिष्ठेमुळे शक्य झाली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वेळेत मदत मिळावी यासाठी डायल 112 ही प्रणाली अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.