Hingoli Earthquake Management: जिल्ह्यात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
शासकीय इमारतींच्या रेट्रोफिटिंगसाठी अंदाजपत्रके तयार करण्याच्या सूचना
भूकंपरोधक बांधकाम व सुरक्षिततेसंदर्भात सीबीआरआयचे जिल्ह्यात विशेष प्रशिक्षण आयोजित
हिंगोली (Hingoli Earthquake Management) : जिल्ह्यात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 13) जिल्हाधिकारी कार्यालयात मध्यवर्ती इमारत संशोधन संस्था, रुरकी (सीबीआरआय), उत्तराखंड यांच्या समवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सीबीआरआयचे संचालक प्रा. प्रदीप कुमार रामनचार्ला, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठातील भूगर्भशास्त्र विभागाचे प्राध्यापक व भूकंपतज्ञ डॉ. टी. विजय कुमार, अजय चौरसिया तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी सीबीआरआयच्या संचालकांनी इमारतींचे भूकंपरोधक मजबुतीकरण, जुन्या इमारतींचे संरचनात्मक बळकटीकरण (रेट्रोफिटिंग) तसेच भूकंपसुरक्षित बांधकाम याविषयी सादरीकरण करून आवश्यक तांत्रिक माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी भूकंप आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध विभागांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. सीबीआरआयच्या तज्ज्ञांचे पथक हिंगोली जिल्ह्यात भेट देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून त्यांचे विशेष दौरे आयोजित करावेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिकारी, अभियंते आणि संबंधित यंत्रणांसाठी भूकंपसुरक्षित इमारत बांधकाम व सुरक्षिततेबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
याशिवाय सीबीआर आयच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच अन्य शासकीय इमारतींच्या रेट्रोफिटिंगसाठी आवश्यक अंदाजपत्रके तयार करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी संबंधित विभागांना दिल्या. या बैठकीदरम्यान संचालक प्रा. प्रदीप कुमार रामनचार्ला यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना उत्तराखंड येथील सीबीआरआय संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. बैठकीस जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.