काही पेट्रोल पंप चालकांच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे.
थकीत पैसे न भरल्याने कंपनीने केला पुरवठा ठप्प
गडचिरोली (Fuel Crisis) : जिल्ह्यात अनेकजण रस्त्यालगत पेट्रोल पंपाची दुकाने थाटून बसले असले तरी मार्च एंडिंग असतांनाही काही जणांनी पेट्रोलियम कंपन्यांचे थकीत चुकारे न दिल्यामुळे कंपन्यांनी अशा पेट्रोल पंप धारकांचा पेट्रोल,डिझेल पुरवठा बंद केला आहे. काही पेट्रोल पंप चालकांच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात पेट्रोल व डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे.परिणामी पेट्रोल असलेल्या पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

आधीच आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच मागील 3 दिवसापासून जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोलपंपावर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामागे आखाती युद्धाचे कारण नसुन पेट्रोलपंपचालक व कंपन्यांचा आपसी वाद असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक पंप धारकांनी पुरावठाधारांचे वेतन थकीत ठेवल्यामुळे कंपन्यांनी अशा पेट्रोल पंपाचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे नियमित बिल अदा करणाऱ्या पेट्रोल पंपावर नागरिकांची झुंबड उडाली. गडचिरोली, देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी, भामगड सह अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नियमित बिल अदा करणाऱ्या पेट्रोल पंपावरील आवश्यक साठा देखील संपत असल्यामुळे पेट्रोल मिळणे बंद झाले आहे.
जिल्ह्यात 50 पेट्रोल पंप, काही ठिकाणी लांबचलांब रांगा तर काही बंदच
शनिवारपासून गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पेट्रोलची टंचाई प्रकर्षाने जाणवु लागली. गडचिरोली शहरातील एक-दोन पेट्रोपंप वगळता उर्वरीत सर्व पेट्रोलपंपावर पेट्रोल उपलब्ध नव्हते. मनमानी करणाऱ्या पेट्रोल पंप चालकावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी. स्वतःच्या थकीत बिलामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप देणाऱ्या अशा पेट्रोल पंप धारकांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिकांतून व्यक्त होत आहे. पेट्रोल पंप चालविण्याची कुवत नसतानाही अनेकांनी पेट्रोल पंप सुरू करून स्वतःच्या चुकीमुळे जिल्ह्यात कुत्रीम पेट्रोल टंचाई निर्माण केली आहे. या पेट्रोल पंप चालकांच्या मनमाणीमुळे आपापले कामे, धंदे सोडून नागरिकांना उन्हातानात पूर्ण दिवस रांगेमध्ये उभे राहावे लागत आहे. काही पेट्रोल पंप मागील 10 ते 15 दिवसापासून सातत्याने बंद आहेत. त्यांच्याकडील थकीत बिलामुळे कंपन्यानी त्यांना पुरवठाच बंद केला आहे. त्यामुळेच नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.अशा पेट्रोल पंप चालकांची माहिती घेऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी अशा पेट्रोल पंपांना कायमचे टाळे लावावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
पॅनिक नागरिकांची ही पेट्रोल टंचाईत भर
पेट्रोल न मिळण्याच्या भीतीमुळे अनेक नागरिक अनावश्यक पेट्रोल साठा करून ठेवत आहेत. अशा पॅनिक नागरिकांच्या नाहक भीतीमुळे देखील उपलब्ध असलेल्या पेट्रोल पंपावरील साठा लवकर संपत आहे. दरोरोज 50 ते 100 रुपयाचं पेट्रोल भरणारे दुचाकी स्वार देखील पाचशे ते हजार रुपयांचे पेट्रोल भरण्यावर भर देत आहेत.

चौकशी करून कारवाई करणार: जिल्हा पुरवठा अधिकारी
युद्धाचा व जिल्ह्यात पेट्रोल तुटवड्याचा कोणताही संबंध नसतांना जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल टंचाईला कारणीभूत असणाऱ्या अशा पेट्रोल पंपाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी पवार यांनी देशोन्नतीशी बोलताना दिली. नागरिकांनी देखील पॅनिक न होता आवश्यक तेवढेच पेट्रोल आपल्या वाहनांमध्ये भरावे, असे आवाहन देखील पवार यांनी केले आहे.
