Breaking News
  • सलग दुसऱ्या दिवशी शिंदखेडा शहरासह जिल्हात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी
  • पुण्यात कोयत्याची दहशत कायम, हातात कोयता आणि बंदूक घेऊन तरुणाने पसरवली दहशत
  • अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदमधील प्रभाग 4 मध्ये भाजपचा दुहेरी विजय
  • अकोला जिल्ह्यातील पातुर नगरपालिकेवर काँग्रेस- शिवसेना उबाठा आघाडीचे वर्चस्व
  • गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी
  • भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे
  • रायगड जिल्ह्यातील स्विमिंग पूल 30 जून पर्यंत बंद ठेवण्यासंबंधी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आदेश जारी केले आहेत.
  • गडचिरोलीत 5 परीक्षा केंद्रांवर नीट-यूजीची फेरपरीक्षा सुरू
  • पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

होम > आपले शहर

मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!

दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


मुंबई हादरले बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू

Food Poisoning |

कुटुंबीयांचा हृदयद्रावक मृत्यू; परिसरात खळबळ

मुंबई (Food Poisoning) : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड सेवन केल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली असून, जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना सर्वांचा मृत्यू झाला. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भेंडी बाजारातील डोकाडिया कुटुंबावर शोककळा

भेंडी बाजारातील ‘मुघल बिल्डिंग’मध्ये राहणारे अब्दुल्ला डोकाडिया (४०), पत्नी नसरीन (३५) आणि मुली आयशा (१६) व झैनब (१३) हे चौघे या घटनेतील मृत आहेत. अब्दुल्ला अंधेरीत मोबाईल ॲक्सेसरीजचे दुकान चालवत होते. त्यांच्या दोन्ही मुली परीक्षेच्या निकालाची वाट पाहत होत्या—आयेशा दहावीच्या निकालात चांगले गुण मिळवेल अशी अपेक्षा होती, तर झैनब नववीत जाणार होती.

जेवणानंतर सुरू झाला त्रास

शनिवारी रात्री कुटुंबाने भावंडांना जेवणासाठी बोलावले होते. सुमारे नऊच्या सुमारास सर्वांनी बिर्याणी आणि इतर पदार्थांचा आस्वाद घेतला. पाहुणे परतल्यानंतर उरलेले अर्धे कलिंगड घरच्यांनी खाल्ले आणि झोपले. मात्र पहाटेच्या सुमारास सर्वांना पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरू झाला. ओळखीच्या डॉक्टरांना बोलावून औषधोपचार करण्यात आले; काही वेळ प्रकृती सुधारली, पण नंतर पुन्हा बिघाड झाला.

इमारतीत गोंधळ; डॉक्टरांची मदत

रविवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान इमारतीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शेजाऱ्यांनी मदतीसाठी होमिओपॅथिक डॉक्टर झैद कुरेशी यांना बोलावले. तपासणीदरम्यान झैनबची नाडी लागत नसल्याचे व तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले, तर इतर तिघांचीही स्थिती गंभीर होती.

तत्काळ रुग्णालयात हलवणी; झैनबचा मृत्यू

त्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. सुरुवातीला मोहम्मद अली रोडवरील साबू सिद्दीकी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे झैनबला मृत घोषित करण्यात आले. उर्वरित तिघांना पुढील उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले.

डॉक्टरांचे निरीक्षण व संशय

जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले की, “शिळ्या कलिंगडामुळे इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होणे अत्यंत दुर्मिळ आहे. अन्नात भेसळ किंवा अन्य काही कारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व शक्यतांचा तपास सुरू आहे.”

एकामागोमाग मृत्यू; पोलिस तपास सुरू

उपचारादरम्यान नसरीन, आयेशा आणि अखेरीस रविवारी रात्री अब्दुल्ला यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी अब्दुल्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला असून त्याआधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती जे. जे. मार्ग पोलिसांनी दिली.

इतरांना त्रास नाही; संशय अधिक गडद

त्याच जेवणात सहभागी झालेल्या इतर पाच जणांना कोणताही त्रास झाला नसल्याने केवळ कलिंगडामुळे विषबाधा झाली असण्याची शक्यता कमी मानली जात आहे. त्यामुळे आत्मघात, घातपात किंवा इतर कारणांचा तपासही पोलिसांकडून केला जात आहे.

तज्ज्ञांचे मत; कलिंगड सुरक्षित फळ

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कलिंगड हे सुरक्षित फळ असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक पाणी असते. केईएम रुग्णालयाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. आकाश शुक्ला यांनी स्पष्ट केले की, शिळ्या कलिंगडामुळे मृत्यू होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये कडू काकडीमुळे मृत्यू झाल्याचे उदाहरण आहे; मात्र कलिंगडाबाबत घाबरण्याचे कारण नाही.

फूड पॉयझनिंगची लक्षणे; मूत्रपिंडांवर परिणाम

दरम्यान, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की रुग्णांमध्ये फूड पॉयझनिंगची लक्षणे दिसत होती आणि त्यांच्या मूत्रपिंडांवरही गंभीर परिणाम झाला होता.

Related to this topic: