बी. एड. सीईटी परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर सुरू आहे.
वैनगंगा महाविद्यालयात बी. एड. सीईटी परीक्षेदरम्यान प्रचंड गोंधळ
नागपूर (Exam Mismanagement) : बी. एड. सीईटी परीक्षा विविध परीक्षा केंद्रांवर सुरू आहे. त्यात शहरातील वैनगंगा अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर बुधवार २७मार्च रोजी परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. तांत्रिक बिघाड, इंटरनेटची अनुपलब्धता आणि नियोजनाचा अभाव यामुळे दुपारच्या सत्रातील परीक्षा वेळेवर सुरू होऊ शकली नाही, परिणामी शेकडो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी दुपारी ३ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. नियमानुसार विद्यार्थ्यांनी दुपारी १ वाजेपासूनच केंद्रावर हजेरी लावली होती. मात्र, ३ वाजले तरी विद्यार्थ्यांना लॅबमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हर डाऊन असल्याचे सांगत महाविद्यालय प्रशासनाने परीक्षा लांबणीवर टाकली. साडेतीन वाजेपर्यंत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
या गोंधळासाठी विद्यार्थ्यांनी थेट परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला आणि महाविद्यालय प्रशासनाला जबाबदार धरले आहे. 'आम्ही दुरून, ग्रामीण भागातून परीक्षेसाठी आलो आहोत. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर परीक्षा होणार नाही असे सांगितले जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने दिली. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही याच केंद्रावर असाच तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या. तरीही पुन्हा याच महाविद्यालयाला केंद्र का देण्यात आले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. केवळ तांत्रिक बिघाडच नाही, तर इतर व्यवस्थापनाबाबतही विद्यार्थ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. केंद्रावर मोबाईल आणि बॅग ठेवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून पैसे वसूल केले जात होते. परीक्षेसाठी हजारो रुपये फी भरल्यानंतरही अशा प्रकारे आर्थिक लूट होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
असेस इन्फ्राकडून एज्युस्पार्कला कंत्राट
मिळालेल्या माहितीनुसार एमएचसीईटीने याबाबतचा कंत्राट बाह्य एजन्सीअसेसइन्फ्राया कंपनीला दिला आहे. त्या कंपनीने एज्युस्पार्क या कंपनीला परीक्षा केंद्रांवर सॉफ्टअवेअर चालविणे तसेच परीक्षा घेण्याचा कंत्राट दिला होता.
परीक्षा घेण्यासाठी लागणारा सर्वरदेखील एज्युस्पार्क कंपनीकडे होता. महाविद्यालयांकडून परीक्षेकरिता संगणक, बैठक व्यवस्था उपलब्ध करून देत असते.महाविद्यालयाने तीन ते चार दिवसांपूर्वीच बैठक व्यवस्था व संगणक एज्युस्पार्ककडून आलेल्या तीन अभियत्यांकडे सुपुर्द केल्या होत्या. त्यांनी परीक्षेच्या आधीच सर्व संगणक व्यवस्थित सुरू असल्याची खातरजमा करून घेतली. परंतु, शुक्रवारी परीक्षेच्या अर्ध्या तासाआधीच सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण लक्षात आली.
पोलिसांनी आणली परिस्थिती नियंत्रणात
महाविद्यालय प्रशासनाच्या मते, तांत्रिक जबाबदारी ही बाह्य एजन्सीची होती. सर्व्हरमध्ये अचानक बिघाड झाल्याने लॉग-इन प्रक्रिया थांबली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर तांत्रिक बिघाड दुरुस्त न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच परत जावे लागले. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून, 'सीईटी सेल' आता या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेणार की त्यांना आहे त्याच परिस्थितीत सामावून घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.