Employee Samadhan Camp: शासन सेवेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रलंबित अडचणी तातडीने व कार्यक्षमतेने सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून
सेवाविषयक प्रलंबित अडचणींच्या तातडीने निवारणासाठी प्रशासनाचा पुढाकार
हिंगोली (Employee Samadhan Camp) : शासन सेवेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रलंबित अडचणी तातडीने व कार्यक्षमतेने सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबिर’ आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांनी सर्व विभाग प्रमुखांना कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अर्जांची माहिती कर्मचारी समाधान शिबीर विवरणपत्र ‘अ’ व ‘ब’ मध्ये तात्काळ भरून सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, विविध विभागांचे प्रमुख तसेच प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासनाच्या या उपक्रमांतर्गत तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील अडचणी संबंधित तहसील कार्यालयात, जिल्हास्तरीय अडचणी जिल्हाधिकारी कार्यालयात तर विभागीय स्तरावरील अडचणी विभागीय आयुक्त कार्यालयातील शिबिरांमध्ये स्वीकारण्यात येणार आहेत.
यावेळी अर्जदार अधिकारी, कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिबिरास उपस्थित राहून आपल्या समस्या व अडचणी मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले. वेतन, पदोन्नती, विविध प्रकारच्या रजा, निवृत्तीवेतन, सेवापुस्तिका अद्ययावतीकरण यांसारख्या सेवाविषयक बाबींसाठी कर्मचाऱ्यांना अनेकदा विविध प्रशासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने या शिबिरांच्या माध्यमातून अशा प्रकरणांचा एकाच ठिकाणी आणि निश्चित कालावधीत निपटारा करण्याची व्यवस्था निर्माण केली आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी हे शिबिर आयोजित करण्यात येणार असून, पहिला शुक्रवार शासकीय सुट्टीचा दिवस असल्यास त्यापूर्वीच्या कामकाजाच्या दिवशी शिबिराचे आयोजन केले जाईल. तसेच सर्व कार्यालयांनी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांची यादी अद्ययावत ठेवून ती संबंधित शिबिरामध्ये समाविष्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या (Employee Samadhan Camp) उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व सेवाविषयक प्रकरणांचे वेळेत निवारण होऊन प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळणार आहे. सर्व विभाग प्रमुखांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले असून, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी दिली.