Parbhani ST Bus: परभणी–गंगाखेड मार्गावरील रिसोड आगाराच्या एसटी बसने दैठणा बसथांब्यावर न थांबता एका ८० ते ८५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला दोन किलोमीटर पुढे उतरविल्याचा धक्कादायक प्रकार
उन्हात दोन किलोमीटर पायी चालण्याची वेळ
प्रवाशांच्या हस्तक्षेपानंतरही ब्लॅक स्पॉटवर उतरविल्याचा आरोप, कारवाईची दैठणेच्या नागरिकांची मागणी
परभणी (Parbhani ST Bus) : परभणी–गंगाखेड मार्गावरील रिसोड आगाराच्या एसटी बसने दैठणा बसथांब्यावर न थांबता एका ८० ते ८५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला तब्बल दोन किलोमीटर पुढे इंद्रायणी नदी पुलाजवळ उतरविल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (१५ जुलै) सकाळी घडला. धोकादायक व अपघातप्रवण ठिकाणी महिलेला उतरविल्याने संताप व्यक्त होत असून संबंधित चालक-वाहकावर कठोर कारवाई करण्याची मागणी दैठणातील केली आहे.
परभणी तालुक्यातील दैठणा येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेत निष्काळजीपणाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. रिसोड आगाराची परभणी–गंगाखेड मार्गावरील बस बुधवारी (१५ जुलै) सकाळी सुमारे ११ वाजता दैठणा बसथांब्यावर न थांबवता थेट पुढे नेण्यात आली. यामुळे बसमधील ८० ते ८५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला तब्बल दीड ते दोन किलोमीटर पुढे इंद्रायणी नदी पुलाजवळ उतरविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधित महिला परभणीहून दैठणा येथे आपल्या मुलीकडे जाण्यासाठी बसमध्ये चढल्या होत्या. त्यांनी वाहकाला दैठणा येथे उतरायचे असल्याचे आधीच सांगितले होते. मात्र, बस दैठणा बसथांब्यावर न थांबवता पुढे नेण्यात आली. यावेळी महिलेने पुन्हा विनंती केली असता, "ही बस दैठण्यात थांबत नाही, तुम्हाला कळत नाही का?" अशा अरेरावीच्या भाषेत उत्तर दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. दरम्यान, बसमधील इतर प्रवाशांनी चालक व वाहकाला बस थांबविण्याची विनंती केली. त्यानंतर बस दैठणा बसथांब्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील इंद्रायणी नदी पुलाजवळ थांबवून महिलेला खाली उतरविण्यात आले.
परभणी–गंगाखेड महामार्गावरील (Parbhani ST Bus) दैठणा परिसर हा अपघातप्रवण (ब्लॅक स्पॉट) म्हणून ओळखला जातो. या मार्गावर वारंवार गंभीर अपघात होत असल्याने अशा धोकादायक ठिकाणी ज्येष्ठ महिलेला उतरविल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कडक उन्हात महिलेला दोन किलोमीटर पायी चालण्याची वेळ आली. या घटनेनंतर त्यांचा रक्तदाब वाढल्याचेही नातेवाईकांनी सांगितले.सुदैवाने, त्याच मार्गाने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने मानवतेचा परिचय देत संबंधित महिलेला दैठणा बसथांब्यापर्यंत सुरक्षित पोहोचविले. त्यामुळे पुढील संभाव्य अनर्थ टळला.
या (Parbhani ST Bus)घटनेची गंभीर दखल घेत संबंधित एसटी चालक व वाहकावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच दैठणा बसथांब्यावर नियोजित सर्व एसटी बसेस नियमित थांबतील, याची खात्री करावी, अशी मागणी दैठणा परिसरातील नागरिकांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली आहे.