पुणे शहर पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक, हवालदार आणि महिला शिपाई यांच्या दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढीवर स्थगिती; विभागीय चौकशीत निष्काळजीपणाचा ठपका
पुणे शहर पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या तपासासाठी सातारा येथे गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि महिला पोलीस शिपाई यांनी तपासाऐवजी पर्यटनाला प्राधान्य दिल्याचा निष्कर्ष विभागीय चौकशीत समोर आला. या प्रकरणात अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी संबंधित तिघांची दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे.
४ एप्रिल रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, महिला पोलीस शिपाई आणि फिर्यादी सातारा जिल्ह्यात गेले होते. मात्र, तपास प्रभावीपणे पूर्ण करण्याऐवजी केवळ प्राथमिक स्वरूपाची कार्यवाही करून उर्वरित वेळ पर्यटनासाठी वापरल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले.
चौकशी अहवालानुसार, साताऱ्यात पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांना आपल्या उपस्थितीची माहिती देणे आवश्यक असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांनी तसे केले नाही. त्याऐवजी त्यांनी प्रसिद्ध कणसे ढाब्यावर भोजन केले. त्यानंतर दुपारी सुमारे ३.१५ वाजता शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. मात्र, घटनास्थळावरील संबंधित व्यक्ती किंवा परिसरातील नागरिकांची चौकशी करण्यात आली नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पंचनामा पूर्ण झाल्यानंतर पुण्याकडे परतण्याऐवजी संबंधित तिघांनी साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठारासह इतर पर्यटनस्थळांना भेट दिल्याचे चौकशीत उघड झाले. या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या महिला फिर्यादीने आपल्या आईची प्रकृती गंभीर असल्याने लवकर पुण्याकडे रवाना होण्याची विनंती केली होती. मात्र, त्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही विभागीय चौकशीत समोर आले.
पर्यटनस्थळांना भेट दिल्यानंतर संबंधित कर्मचारी आणि फिर्यादी रात्री १ वाजण्याच्या सुमारास पुण्यात पोहोचले. त्यानंतर महिला फिर्यादीला सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याऐवजी प्रथम स्वारगेट बसस्थानकावर सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिर्यादीच्या विनंतीनंतर तिला शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ सोडण्यात आले. महिला फिर्यादीच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती दक्षता न घेतल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या विभागीय चौकशीत महिला पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या दोन्ही सहकाऱ्यांनी कर्तव्यात बेशिस्तपणा, निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा केल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. त्यांच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवत अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी संबंधित तिघांची दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली.