SC Reservation Morcha: जिल्ह्यातील अनुसूचित जाती बौद्ध समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली असा प्रचंड मोर्चा
हिंगोली (SC Reservation Morcha) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती बौद्ध समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली असा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हिंगोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वाजत-गाजत हा मोर्चा निघाला. मोर्चामध्ये महिला व पुरुषांनी हातामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचे विरोधात संदेश असणारे फलक धरले होते. त्याचबरोबर निळे आणि पंचशील ध्वज सुद्धा मोर्चेकरांनी फडकवत मोर्चात सहभाग नोंदविला. विविध घोषणाबाजी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक, इंदिरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी मोर्चामध्ये सहभागी झालेल्या विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी मोर्चाकरांना मार्गदर्शन केले.

तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण होऊ देणार नाही असा निर्धार यावेळी वक्त्यांनी व्यक्त केला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर. ज्येष्ठ नेते मधुकरराव मांजरमकर किरण घोंगडे, दादासाहेब शेळके, दिनेश हनुमंते, रवींद्र वाढे, विजयकुमार एंगडे, ॲड. रावण धाबे, ज्योतीपाल रणवीर, सुखदेव बलखंडे, अमित कळासरे, बंडू नरवाडे, प्रकाश इंगोले, भीमराव कुरवाडे, योगेश नरवाडे, गौतम मोगले, आनंद धुळे, विनोद थोरात, भदंत पय्याबोधी थेरो, ॲड. आनंद खिलारे, ॲड. गुणानंद पतंगे, चंद्रकांत फुंडसे, दिलीप भिसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, शासनाने नियुक्ती केलेल्या अनंत बदर आयोगाचा अहवाल सार्वजनिक करावा, देशात व राज्यात जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, (SC Reservation Morcha) अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार आरक्षणामध्ये वाढ करण्यात यावी, अनुसूचित जाती जमातीचा शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये अनुशेष तात्काळ भरण्यात यावा, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी मोर्चामध्ये हिंगोली जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातून अनुसूचित जाती बौद्ध समाजाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते झाले होते.