Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सेनगाव तहसील कार्यालयास भेट देऊन तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), मंडळ अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा ब
प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश
हिंगोली () : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सेनगाव तहसील कार्यालयास भेट देऊन तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), मंडळ अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महसूल विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित कामांची स्थिती आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरवदे, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता (Collector Rahul Gupta) यांनी वनजमिनीच्या नोंदी, लँड बँक निर्मिती, ई-पीक पाहणी, आगामी जनगणना तयारी, रस्ते विकास कामे, सार्वजनिक वितरण व्यवस्था (पुरवठा विभाग), शासकीय इमारतींची बांधकामे तसेच विविध महसुली विषयांचा सखोल आढावा घेतला. प्रत्येक विभागाच्या कामकाजाची प्रगती, अडचणी आणि प्रलंबित बाबींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
यावेळी त्यांनी ई-पीक पाहणीचे काम अचूक व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांच्या नोंदी अद्ययावत ठेवण्यावर भर दिला. वनजमिनीच्या नोंदींची शहानिशा करून संबंधित प्रकरणे नियमानुसार मार्गी लावावीत, तसेच लँड बँकसाठी आवश्यक माहिती संकलित करून अद्ययावत ठेवावी, असे निर्देश दिले. जनगणना पूर्वतयारीबाबत आवश्यक नियोजन, मनुष्यबळ व्यवस्थापन व माहिती संकलनाची प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच रस्ते व इमारत बांधकामांच्या कामांचा नियमित पाठपुरावा करून गुणवत्तापूर्ण व वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना नियमित व पारदर्शक पद्धतीने धान्य वितरण होईल याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नागरिकांच्या तक्रारींना तातडीने प्रतिसाद देऊन महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा वेळेत निपटारा करावा, असेही त्यांनी सांगितले. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित कामे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश देत, शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी (Collector Rahul Gupta) यावेळी नमूद केले.