SIR Process: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाला चिखली विधानसभा मतदारसंघात प्रारंभ झाला आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघातील ३ लाखांहून अधिक मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी
चिखली (SIR Process) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाला चिखली विधानसभा मतदारसंघात प्रारंभ झाला आहे. या उपक्रमांतर्गत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी सर्व मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी २२ जून २०२६ रोजी तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. मतदार नोंदणी अधिकारी राजेंद्र पोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षणात १३ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, ३१७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), ५७ मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.
निवडणूक आयोगाचे एनएलएमटी पी. एम. साने यांनी ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन केले, तर विधानसभा मतदारसंघाच्या मास्टर ट्रेनर्सनी प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन पुनरीक्षण प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली.
या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची माहिती संकलित करणार आहेत. प्रत्येक मतदाराला गणना पत्रकाच्या (EF) दोन प्रती देण्यात येतील. त्यातील माहितीची पडताळणी करून आवश्यक तपशील भरून स्वाक्षरीसह संबंधित बीएलओकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक असणे आणि १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील एकूण ३ लाख १ हजार ७२० मतदारांची या विशेष मोहिमेत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे.
या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या मतदान प्रतिनिधींचे (बीएलए) सहकार्यही महत्त्वाचे ठरणार असून, यामुळे मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नव्या पात्र मतदारांची नोंदणी करणे सुलभ होणार आहे. मतदार याद्या अधिक अचूक व त्रुटीरहित करण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सर्व मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी राजेंद्र पोळ यांनी केले आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक :
अर्हता दिनांक – १ ऑक्टोबर २०२६
तयारी, प्रशिक्षण व छपाई – २० जून ते २९ जून २०२६
बीएलओमार्फत घरोघरी भेटी – ३० जून ते २९ जुलै २०२६
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण – २९ जुलै २०२६ पर्यंत
प्रारूप मतदार याद्यांचे प्रकाशन – ५ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी – ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६
दावे व हरकतींची सुनावणी व निपटारा – ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार याद्यांचे प्रकाशन – ७ ऑक्टोबर २०२६.