चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील २१ वर्षीय गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
जिजा हंसराज सातर यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचा संताप; आरोग्य विभागाने मात्र उपचारात कसूर झाल्याचा आरोप फेटाळला
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील जामगिरी येथील २१ वर्षीय गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जिजा हंसराज सातर यांना प्रसूतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दुसरीकडे, आरोग्य विभागाने उपचारात कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा झाल्याचे आरोप स्पष्टपणे नाकारले आहेत.
जामगिरी येथील जिजा सातर यांना रविवारी पहाटे ५ वाजता पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ९ वाजता त्यांना प्रसूतीकळा सुरू झाल्या. काही वेळात प्रसूती होईल, असे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रसूती न होता त्यांचा त्रास वाढत गेला.
कुटुंबीयांनी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातच सिझर करण्याची विनंती केली होती. मात्र, सकाळी साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान जिजा सातर यांना गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात पाठविण्यात आले. गडचिरोलीला पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी बाळाचे ठोके बंद झाल्याची माहिती दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
त्यानंतर प्रसूती झाली, मात्र अतिरक्तस्रावामुळे जिजा सातर यांची प्रकृती गंभीर झाली. उपचार सुरू असतानाच सायंकाळी ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत बाळाचाही मृत्यू झाला.
मृत महिलेच्या पतीने गंभीर आरोप करत सकाळी ५ वाजता रुग्णालयात दाखल केल्यानंतरही सकाळी ११ वाजेपर्यंत कोणतेही उपचार करण्यात आले नसल्याचा दावा केला आहे. रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नव्हते आणि डॉक्टर आल्याशिवाय रेफर करता येणार नाही, असे नर्सने सांगितल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या घटनेनंतर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. जिजा सातर यांची गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यापासून याच रुग्णालयात तपासणी सुरू होती. मात्र, सोनोग्राफीसाठी त्यांना प्रत्येक वेळी खासगी क्लिनिकमध्ये पाठवण्यात येत असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने कुटुंबीयांचे आरोप फेटाळले आहेत. डॉक्टर उपलब्ध नव्हते, हा आरोप चुकीचा असल्याचे चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण किलनाके यांनी सांगितले. जिजा सातर यांच्या प्रसूतीची वेळ अद्याप पूर्ण झालेली नव्हती. पूर्ण वेळ होईपर्यंत ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले. प्रसूती न झाल्याने त्यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनीही महिलेची प्रसूती चामोर्शी येथेच व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, प्रसूती न झाल्याने त्यांना महिला व बाल रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांच्या पथकाने प्रयत्न केले, मात्र अतिरक्तस्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.
आरोग्य विभागाने उपचारात कसूर झाली नसल्याचा दावा केला असला, तरी २१ वर्षीय मातेचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.