पुण्यातील हडपसर परिसरातील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सापडलेल्या स्फोटकसदृश वस्तूप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत नागपूर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
ठाणे (Bomb Threat Case) : पुण्यातील हडपसर परिसरातील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सापडलेल्या स्फोटकसदृश वस्तूप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत नागपूर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
ATS च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी राठोड असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून त्याला नागपूर रेल्वे स्थानकावरून पकडण्यात आले. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून तपास सुरू आहे.
रुग्णालयात सापडली स्फोटकसदृश वस्तू
हडपसरमधील उषाकिरण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील पुरुषांच्या स्वच्छतागृहात बुधवारी सायंकाळी टाइमर आणि ‘लो-ग्रेड एक्स्प्लोसिव्ह’ असलेली स्फोटकसदृश वस्तू आढळून आली होती.
रुग्णालयाचे संचालक डॉ. विलास गायकवाड यांनी सांगितले की, सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास एका महिला कर्मचाऱ्याच्या लक्षात ही वस्तू आली. त्यानंतर त्यांनी ती वस्तू सुरक्षितपणे एका बॉक्समध्ये ठेवून रुग्णालयाबाहेरील मोकळ्या जागेत हलवली आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्या वस्तूवर वायर, जेलॅटिनसारख्या कांड्या आणि ७.१० असा वेळ दाखवणारा टाइमर होता.
गुन्हा दाखल, विविध यंत्रणा तपासात
या प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (१) (खूनाचा प्रयत्न) तसेच स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहर पोलिसांसह ATS आणि गुप्तचर यंत्रणाही या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत.
सीसीटीव्हीतून संशयिताची ओळख
तपासादरम्यान पोलिसांनी रुग्णालय आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये शिवाजी राठोड हा संशयित दिसून आल्याची माहिती मिळाली. पुढील चौकशीत तो हडपसरजवळील मांजरी परिसरातील भाड्याच्या घरात राहत असल्याचे उघड झाले. मात्र, पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकण्यापूर्वीच तो फरार झाल्याचे समोर आले.
नागपूरहून अटक; तपास सुरूच
मिळालेल्या माहितीच्या आधारे ATS ने नागपूर येथून राठोडला ताब्यात घेतले. स्फोटकसदृश उपकरण नेमके कुठे आणि कसे तयार करण्यात आले, तसेच त्यामागील उद्देश काय होता याचा तपास सुरू आहे.
तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात असून फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून जप्त केलेल्या स्फोटकसदृश वस्तूची रचना आणि वापरलेल्या साहित्याचा तपास केला जात आहे.