मुंबईतील बेस्ट बस अपघातांची मालिका सुरूच असून, बुधवारी सकाळी भांडुप पश्चिम येथे आणखी एक अपघात घडला.
पादचारी बस आणि कुंडीमध्ये अडकला; गोंधळात बस दोन दुचाकी व एका रिक्षावर जाऊन धडकली
मुंबई : मुंबईतील बेस्ट बस अपघातांची मालिका सुरूच असून, बुधवारी सकाळी भांडुप पश्चिम येथे आणखी एक अपघात घडला. कोकण नगर परिसरात रिव्हर्स घेत असलेल्या बेस्ट बसची धडक बसल्याने ४३ वर्षीय पादचारी जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
बेस्ट नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, हा अपघात बुधवार, ८ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडला. ओशिवरा डेपोतून A-425/32 मार्गावर धावणारी बस क्रमांक ४०४७ या अपघातात सहभागी होती.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी पादचाऱ्याचे नाव अतुल अनंत पडवे (वय ४३) असे आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बस चालक कोकण नगरच्या दिशेने उजवीकडे वळण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वळण व्यवस्थित घेता न आल्याने त्याने बस रिव्हर्स घेतली. त्यावेळी बसच्या मागील भागाची धडक अतुल पडवे यांना बसली.
धडकेनंतर अतुल पडवे हे रस्त्यालगत ठेवलेल्या मोठ्या झाडाच्या कुंडी आणि बसच्या मागील भागामध्ये अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी बसला धक्का दिला. त्यामुळे बस पुढे सरकली आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि एका रिक्षावर जाऊन आदळली.
या अपघातात अतुल पडवे यांच्या दोन्ही मांड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रक्तस्त्रावही झाला. बस वाहकाने त्यांना तातडीने मुलुंड येथील एम. टी. अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच विशेष बस निरीक्षक आणि संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताची चौकशी सुरू असून भांडुप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
दरम्यान, जखमी अतुल पडवे यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. तसेच बस रिव्हर्स घेताना सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का आणि अपघातास कारणीभूत ठरलेल्या संपूर्ण घटनाक्रमाची संबंधित यंत्रणांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.