बापूसाहेब देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
‘गाडगे बाबा मिशन, मुंबई’चे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांवर आज मूर्तिजापूर येथे अंत्यसंस्कार
अमरावती : संत गाडगेबाबांच्या विचारांचा आणि समाजसेवेचा वारसा आयुष्यभर पुढे नेणारे ‘गाडगे बाबा मिशन, मुंबई’चे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील नागरवाडी येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी ५ वाजता अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बापूसाहेब देशमुख यांना संत गाडगेबाबांचा प्रत्यक्ष सहवास लाभला होता. गाडगेबाबांनी महाराष्ट्रभर उभारलेल्या शाळा, आश्रमशाळा आणि धर्मशाळांच्या माध्यमातून गरजू व गोरगरीब समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्यात देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
साधी राहणी आणि उच्च विचार ही जीवनमूल्ये जपत त्यांनी संत गाडगेबाबांचा अंधश्रद्धा निर्मूलन तसेच स्वच्छतेचा संदेश समाजाच्या विविध स्तरांपर्यंत पोहोचविला. ‘गाडगे बाबा मिशन’च्या माध्यमातून राज्यभर शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविताना त्यांनी अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा आधार दिला.
गाडगेबाबांच्या विचारांशी कोणतीही तडजोड न करता समाजसेवेलाच आपल्या आयुष्याचे ध्येय मानून बापूसाहेब देशमुख यांनी कार्य केले. त्यांच्या निधनामुळे गाडगेबाबांच्या विचारांवर निष्ठेने वाटचाल करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
बापूसाहेब देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याला उजाळा देत अनेकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या पश्चात मुले, मुली आणि आप्तपरिवार असा मोठा परिवार आहे.
आज सायंकाळी ५ वाजता मूर्तिजापूर येथे अंत्यसंस्कार
बापूसाहेब देशमुख यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.