Bank transaction fraud: या खात्यावर ६ कोटी ९७ लाख ३९ हजार रुपयांचा व्यवहार केला. एका खातेदाराला बँकेकडून नोटीस आल्यानंतर सदर प्रकरण उघडकीस आले.
कोतवाली पोलिसात फसवणुकीचा गुन्हा कागदपत्र जमा करत उघडले खाते.....!
परभणी (Bank transaction fraud) : शहरातील पंचशिल नगर परिसरात राहणार्या एका अॅटो चालकासह त्याच्या ओळखीतील व्यक्तींचे आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्र घेऊन बँकेत खाते उघडले. त्यानंतर या खात्यावर ६ कोटी ९७ लाख ३९ हजार रुपयांचा व्यवहार केला. एका खातेदाराला बँकेकडून नोटीस आल्यानंतर सदर प्रकरण उघडकीस आले. फसवणूक करत खाते उघडून बेकायदेशीरपणे आर्थिक व्यवहार केल्या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात २७ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत नरवाडे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे अॅटो चालवितात. त्यांच्या ओळखीतील अविनाश गोविंद आव्हाड याने फिर्यादीला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एक स्किम चालू असून तेथे खाते उघडले तर बँकेकडून तात्काळ एक हजार रुपये रोख तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे, असे सांगितले. यावर विश्वास ठेवून फिर्यादीने खाते उघडले. त्यानंतर अविनाश आव्हाडने फिर्यादीला तुझ्या ओळखीतील व्यक्तींनाही खाते खोलायला सांग आपण त्यांचा फायदा करु, असे म्हणत सात जणांचे खाते उघडायला लावले.
संबंधितांकडून आवश्यक कागदपत्र घेत खाते खोलण्यात आले. या दरम्यान ५ फेब्रुवारी २०२६ रोजी एका खातेदाराला बँकेकडून नोटीस आली. बँकिंग लोकपाल तक्रारीचा विषय होता. संशय आल्याने फिर्यादीसह संबंधित खातेदारांनी बँकेत जावून चौकशी करत बँक खात्याचे स्टेटमेंट तपासले. तेंव्हा या खात्यांमधून जवळपास ७ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समजले. यानंतर सदरील व्यक्तींनी अविनाश आव्हाड याच्याकडे जात जाब विचारला. संबंधिताने मी सर्व पाहुन घेतो, असे म्हणत वेळ मारुन नेली. त्यानंतर फिर्यादी व खातेदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जावून तक्रार दिली. बेकायदेशीरपणे व्यवहार करत आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी अविनाश आव्हाड व इतर अनेक अनोळखी इसमांवर कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कागदपत्र देताना शहानिशा करा
समाज माध्यमांवरील संदेश, स्पॅम फोन कॉल, खोट्या गुंतवणूक योजना, सोने खरेदी - विक्रीचे अमिष, कर्ज मंजुरीच्या नावाखाली होणार्या फसवणुकीपासून नागरीकांनी सावध राहावे. कोणतेही कागदपत्र देण्यापुर्वी संबंधित व्यक्ती, व्यवहाराची शहानिशा करावी. ऑनलाईन व्यवहार करताना आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. - संजय निकुंभ, पोलीस निरीक्षक, कोतवाली.