तालुक्यातील सर्वात मोठे आणि १५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले नवरगाव आज विकासाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडत असल्याचे चित्र आहे.
४० ते ५० गावांच्या प्रमुख बाजारपेठेवर रस्त्यांच्या दुरवस्थेचा परिणाम; नागरिकांकडून तातडीने डांबरीकरणाची मागणी
सिंदेवाही : तालुक्यातील सर्वात मोठे आणि १५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले नवरगाव आज विकासाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला घोंगडी उद्योग, ७ ते ८ मोठ्या भात गिरण्या तसेच समृद्ध सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभलेले हे गाव आज प्रशासकीय अनास्था आणि राजकीय उदासीनतेचा बळी ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. परिसरातील ४० ते ५० गावांची प्रमुख व्यापारपेठ म्हणून ओळख असलेल्या नवरगावच्या विकासाला सभोवतालच्या अत्यंत दुरवस्था झालेल्या व खड्डेमय रस्त्यांमुळे मोठा फटका बसला असून, येथील अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे.
सध्या नवरगावला इतर प्रमुख गावांशी जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रमुख मार्गांची स्थिती
बाजारपेठेला मोठा फटका
राज्यात महामार्ग आणि दर्जेदार दळणवळणाच्या माध्यमातून विकासाचे दावे केले जात असताना नवरगावकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे परिसरातील ग्राहकांनी नवरगावच्या बाजारपेठेकडे पाठ फिरवली असून ते शेजारील शहरांकडे वळत आहेत. परिणामी, स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून एकेकाळी गजबजलेली बाजारपेठ ओस पडत चालली आहे.
नागरिकांची तीव्र मागणी
१७ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या नवरगावमध्ये तालुका बनण्याची पूर्ण क्षमता आणि पात्रता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गाव आजही उपेक्षित राहिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नवरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व रस्त्यांची तात्काळ सुधारणा करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी तीव्र मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास येथील व्यापार आणि विकास पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करत तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.