Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

बच्चू कडू यांचा ट्रोलर्सवर हल्लाबोल; “घाबरणारा नाही, कोणाचीही पर्वा नाही”

शिवसेनेत प्रवेश व विधानपरिषद उमेदवारीनंतर बच्चू कडू यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना ट्रोलर्सवर तीव्र प्रतिक्रिया देत राजकीय मुद्द्यांवर परखड मत मांडले.


बच्चू कडू यांचा ट्रोलर्सवर हल्लाबोल “घाबरणारा नाही कोणाचीही पर्वा नाही”

Bacchu Kadu Statement |

नागपूर (Bacchu Kadu Statement) :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेत सामील झाल्यानंतर तसेच विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय मुद्द्यांवर परखड मत मांडले. या वेळी त्यांनी ट्रोल करणाऱ्यांवर तीव्र शब्दांत निशाणा साधत आपली भूमिका स्पष्ट केली. बोलताना त्यांचा संयम काहीसा सुटल्याचेही दिसून आले.

बच्चू कडू म्हणाले, “ट्रोल करणाऱ्यांनी प्रभू श्रीराम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीही आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. मी त्यांच्या तुलनेत खूपच लहान व्यक्ती आहे. हवसे, नवसे, गवसे कोणीही आले तरी बच्चू कडू घाबरणारा नाही. ट्रोल करणाऱ्यांचे माय-बाप दहा जण आहेत,” असा थेट हल्लाबोल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, “ट्रोल करणाऱ्यांची आम्ही फारशी पर्वा करत नाही. हे लोक 50 पैशांवर विकले जातात. प्रत्येक पक्षाकडे ट्रोलिंगसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. अनेक ट्रोल करणारे पूर्णपणे विकाऊ आहेत. माझ्याविरोधात किती ट्रोल करायचे ते सांगा, एक-दोन लाख रुपयांचा खर्च आहे. पण कोणी ट्रोल करत असेल तरी आम्ही घाबरणारे नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेत प्रवेशानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, “ज्यांना राजकीय काम करायचे आहे ते शिवसेनेत येतील. मात्र काहीजण नालायक असतात, त्यांचा काही उपयोग नाही. ज्यांना सोबत राहायचे आहे त्यांनी शिस्तीत राहावे. मी कोणावरही जबरदस्ती केलेली नाही आणि करणारही नाही. माझा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला, त्यानंतर मी प्रहारमध्ये काम केले. अनेक मोठ्या नेत्यांनी पक्ष बदलले, मात्र बच्चू कडू गेली 25 वर्षे स्वतंत्रपणे प्रहारच्या माध्यमातून लढत राहिला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय आघाड्यांवर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना बच्चू कडू यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, “राष्ट्रवादी पक्ष एकत्र येत आहे त्यावर टीका होत नाही, मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यावरही आक्षेप घेतला जात नाही, काँग्रेस-शिवसेना एकत्र बसल्यावरही काही बोलले जात नाही. मात्र बच्चू कडूवर मात्र सातत्याने टीका केली जाते. त्यामुळे ही दुटप्पी भूमिका आहे,” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, आगामी काळातील आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “पुढील सहा महिन्यांत मी शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न शिवसेनेच्या धोरणात समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दिव्यांग, मजूर आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आणि मजबूत धोरण तयार केले जाईल. शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजूने अधिक सक्षमपणे उभी राहील यासाठी आम्ही काम करणार आहोत. काही लोकांना यामुळे त्रास होत असेल तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

“माझा आत्मविश्वास पक्का आहे आणि कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. मी कधीही थांबणारा माणूस नाही. ही लढाई मोठी आहे आणि शेतकऱ्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे बुलंद केला जाईल,” असे म्हणत बच्चू कडू यांनी आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली.

Related to this topic: