: राजकारणात 'आलात, पाहिलात आणि जिंकलात' ही म्हण सध्या माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे.
भाजपमधील 'पॉवर गेम'मध्ये अशोकराव ठरले 'सुपर बॉस'
नांदेड (Ashok Chavan) : राजकारणात 'आलात, पाहिलात आणि जिंकलात' ही म्हण सध्या माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडत आहे. कालपर्यंत 'काँग्रेसचा चेहरा' असलेले चव्हाण आज भाजपचे 'मॅजिक मॅन' बनले असून, नांदेडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी आणि निवडींनी स्थानिक भाजपमध्ये एका नव्या 'हायकमांड'चा उदय झाल्याचे संकेत दिले आहेत.
जुने निष्ठावंत बॅकफूटवर, 'अशोक पर्व' फ्रंटफूटवर !
भाजपमध्ये अनेक वर्षांपासून सतरंज्या उचलणारे आणि पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणारे जुने निष्ठावंत यंदाच्या निवडींमध्ये काहीसे 'बॅकफूट'वर गेल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेचे महार्पोरपद असो, उपमहापौरपद असो वा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडीः प्रत्येक ठिकाणी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी सुचवलेल्या नावांवरच प्रदेशाध्यक्षांनी डोळे झाकून शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे नांदेड भाजपमध्ये आता 'संघर्ष' नाही तर केवळ 'अशोकराव चव्हाण यांचाच शब्द' चालतो, हे अधोरेखित झाले आहे.
पक्षश्रेष्ठी चव्हाणांवर एवढी मेहेरबान का?
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा गड उद्धवस्त करण्याचा करिश्मा केला आहे. ज्या नांदेडमध्ये भाजपला प्रवेश मिळवणे कठीण होते, तिथे चव्हाणांनी एका झटक्यात स्वबळावर भाजपची सत्ता आणली. हा निकाल मुंबई आणि दिल्लीतील नेत्यांसाठी चकित करणारा ठरला. चव्हाणांचा दांडगा प्रशासकीय अनुभव आणि कार्यकर्त्यांचे जाळे भाजपला मराठवाड्यात 'विस्तार' करण्यासाठी आयते व्यासपीठ मिळाले आहे. निवडणुक कोणतीही असो, नांदेड जिल्ह्यातील बहुतांश जागा भाजपच्या खिशात टाकण्याची क्षमता केवळ चव्हाणच ठेवतात, याची खात्री फडणवीस-बावनकुळे जोडीला पटली आहे.
काय आहे 'चव्हाण पॅटर्न'?
नुकत्याच झालेल्या स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीमध्ये चव्हाणांनी आपल्या जुन्या शिलेदारांना (उदा. अमितसिंह तेहरा आणि इतर) महत्त्वाच्या जागांवर बसवून हे दाखवून दिले की, पक्ष कोणताही असो, त्यांच्या समर्थकांचे पुनर्वसन करण्याची ताकद त्यांच्यात आजही कायम आहे. यालाच राजकीय वर्तुळात 'चव्हाण पॅटर्न' म्हटले जात आहे.
विरोधक हतबल, भाजप अंतर्गत चर्चांना पूर्णविराम !
एकीकडे काँग्रेस आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत असताना, दुसरीकडे भाजपमध्ये चव्हाणांच्या वाढत्या वजनामुळे अंतर्गत कुरबुरींनाही जागा उरलेली नाही. प्रदेश स्तरावरुन मिळालेले 'अभय' आणि स्थानिक स्तरावरील 'लोकप्रियता' यामुळे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण हे आता केवळ भाजपचे एक नेते राहिलेले नसून, ते नांदेडचे 'पॉवर सेंटर' बनले आहेत.