पालघर जिल्ह्यातील विरार येथील अर्नाळा समुद्रकिनारी आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत नालासोपारा पश्चिम भागातील 14 ते 17 वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुले समुद्रात बुडाली.
विरार : पालघर जिल्ह्यातील विरार येथील अर्नाळा समुद्रकिनारी शुक्रवारी सकाळी घडलेल्या दुर्घटनेत नालासोपारा पश्चिम भागातील 14 ते 17 वर्षे वयोगटातील चार अल्पवयीन मुले समुद्रात बुडाली. पोलिस आणि होमगार्ड जवानांच्या तत्परतेमुळे त्यापैकी दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, तर उर्वरित दोघांचा शोध अद्याप सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास ही चारही मुले समुद्रात जाण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी किनाऱ्यावर गस्त घालत असलेल्या पोलीस अंमलदारांसह पुरुष व महिला होमगार्ड जवानांनी त्यांना समुद्रात न उतरण्याचा इशारा देत रोखले. त्यानंतर गस्त पथक पुढे गेल्यानंतर मुलांनी पुन्हा समुद्रात प्रवेश केला.
काही वेळातच समुद्रातील लाटांमध्ये अडकल्याने मुलांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. आवाज ऐकताच पोलिस आणि होमगार्ड जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत समुद्रात उड्या मारल्या. त्यांनी धाडसाने दोन मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, उर्वरित दोघांना समुद्राच्या तीव्र लाटांनी खोल पाण्याकडे ओढल्याने ते बेपत्ता झाले.
दरम्यान, अर्नाळा समुद्रकिनारी 30 सप्टेंबरपर्यंत समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असा बंदी आदेश पोलिस प्रशासनाने लागू केला आहे. याबाबत जनजागृतीसाठी अर्नाळा सागरी पोलिसांनी किनाऱ्यावर इशारा फलकही लावले आहेत. तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.
सध्या जीवरक्षक, सर्च क्लब, अग्निशमन दल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाकडून बेपत्ता दोन्ही मुलांचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे काम सुरू आहे.