राज्यात ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या भेसळीच्या अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) निर्णायक पाऊल उचलले आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश; हॉटेल, रेस्टॉरंट, क्लाऊड किचन आणि केटरर्सनाही निर्बंध लागू
मुंबई : राज्यात ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या भेसळीच्या अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) निर्णायक पाऊल उचलले आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बनावट स्वरूपातील ‘ॲनालॉग पनीर’ (नॉन-डेअरी पनीर) याच्या उत्पादन, विक्री आणि वापरावर राज्यभर एक वर्षासाठी बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. या निर्णयाची अधिसूचना अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार आदेश लागू
ही बंदी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 30(2)(अ) अंतर्गत लागू करण्यात आली आहे. एफडीएच्या निकषांनुसार ‘पनीर’ हा प्रमाणित दुग्धजन्य अन्नपदार्थ असून त्यात दुधातील स्निग्धांश (Milk Fat) असणे अनिवार्य आहे. दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा इतर दुग्धेतर घटकांचा वापर करून तयार केलेले उत्पादन ‘दुग्ध संदर्भातील ॲनालॉग म्हणून गणले जाते. त्यामुळे अशा उत्पादनाला ‘पनीर’ या नावाने विक्री किंवा वितरण करणे कायद्याचे उल्लंघन मानले जाईल.
हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सवरही नियम लागू
या आदेशाचा परिणाम राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालये, क्लाऊड किचन आणि केटरिंग व्यवसायांवर होणार आहे.
- कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये ॲनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीरचा वापर, साठवणूक, विक्री किंवा ग्राहकांना ते वाढण्यास पूर्ण बंदी राहील.
- ग्राहकांना अस्सल पनीर असल्याचा भास निर्माण करून अशा उत्पादनाचा वापर करणे ही दिशाभूल करणारी बाब मानली जाईल.
- नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित उत्पादन 'मिथ्याछापित' (Misbranded) म्हणून घोषित केले जाईल. तसेच संबंधित व्यावसायिकांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करून साठा जप्त व नष्ट करण्यात येईल.
नियमित पनीरच्या विक्रीवर कोणताही परिणाम नाही
एफडीएने स्पष्ट केले आहे की, या आदेशामुळे सर्व प्रकारच्या पनीरवर बंदी आलेली नाही. निर्धारित अन्न सुरक्षा मानकांचे पालन करणारे पनीर पूर्वीप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.
- फुल-फॅट पनीर: निर्धारित निकष पूर्ण करणारे फुल-फॅट पनीर खुले किंवा पॅकबंद स्वरूपात विकता येईल.
- मीडियम व लो-फॅट पनीर: या प्रकारातील पनीरची विक्री सीलबंद पॅकेजमध्येच करावी लागेल. तसेच अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग व प्रदर्शन) विनियम, 2020 मधील सर्व घोषणांचे पालन करणे बंधनकारक असेल.
ॲनालॉग पनीर म्हणजे काय?
ॲनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीर हे दिसायला पारंपरिक पनीरसारखे असले तरी ते दुधाऐवजी संपूर्ण किंवा अंशतः वनस्पती तेल (Vegetable Oil), वनस्पती स्निग्धांश आणि इतर दुग्धेतर घटकांपासून तयार केले जाते.
ॲनालॉग पनीर कसे ओळखावे?
- लेबल तपासा: पॅकेटवर "Analog Cheese/Paneer" किंवा "Non-Dairy Product" असा उल्लेख असल्यास ते ॲनालॉग पनीर असू शकते.
- घटकांची यादी वाचा: Vegetable Fat किंवा Hydrogenated Oil असे घटक नमूद असल्यास ते दुग्धजन्य पनीर नसते.
- चव आणि पोत: अस्सल पनीरच्या तुलनेत ॲनालॉग पनीर अधिक रबरासारखे ताणले जाणारे किंवा तेलकट पोताचे जाणवते.