Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

Akola MIDC

अकोल्यात प्रतिबंधित गुटखा कारखान्यावर संयुक्त धाड; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त, 'मकोका' कारवाईचाही विचार

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर सुरू केलेल्या अवैध गुटखा आणि पान मसाला विरोधी मोहिमेला अकोल्यात मोठे यश मिळाले आहे.


अकोल्यात प्रतिबंधित गुटखा कारखान्यावर संयुक्त धाड ५० लाखांचा मुद्देमाल जप्त मकोका कारवाईचाही विचार

Akola MIDC |

FDA आणि एमआयडीसी पोलिसांची संयुक्त कारवाई; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेला मोठे यश

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर सुरू केलेल्या अवैध गुटखा आणि पान मसाला विरोधी मोहिमेला अकोल्यात मोठे यश मिळाले आहे. अकोला एमआयडीसी परिसरातील प्रतिबंधित गुटखा व पान मसाला तयार करणाऱ्या एका बेकायदेशीर कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला एमआयडीसी क्रमांक ४ परिसरातील एका कारखान्यात शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याचे उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीची पडताळणी करून अन्न व औषध प्रशासन आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त धाड टाकली.

कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात तयार गुटखा, पान मसाला, उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल तसेच पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक साहित्य आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० लाख रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

प्राथमिक तपासात या बेकायदेशीर कारखान्याचा मुख्य संचालक गौरव शर्मा असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईबाबत माहिती देताना अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर यांनी सांगितले की, गौरव शर्माविरुद्ध केवळ गुन्हा दाखल करून न थांबता, त्याच्या संपूर्ण नेटवर्कचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे.

दरम्यान, राज्यातील प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या निर्देशानंतर राज्यभर अशा अवैध अड्ड्यांवर सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत. अकोल्यातील या कारवाईनंतर प्रतिबंधित गुटख्याच्या काळ्या बाजाराशी संबंधित टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि एफडीएचे पथक पुढील तपास करत आहे.

Related to this topic: