सकाळच्या गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना गंभीर त्रास सहन करावा लागला.
टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; मुलुंड स्थानकात 15 मिनिटे खोळंबा, पुढील दोन फेऱ्याही रद्द
मुंबई : सकाळच्या गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना गंभीर त्रास सहन करावा लागला. लोकलमधील एक एसी युनिट बंद पडल्याने बंदिस्त डब्यांमध्ये उकाडा वाढला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन 3 ते 4 प्रवासी बेशुद्ध पडले. मुलुंड रेल्वे स्थानकात ही लोकल सुमारे 15 मिनिटे थांबून राहिल्याने मोठी खळबळ उडाली.
सकाळी 8:33 वाजता टिटवाळा येथून सीएसएमटीच्या दिशेने निघालेली एसी लोकल सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पोहोचली. कार्यालयीन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे लोकलमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. याचदरम्यान एका एसी युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने डब्यातील वातानुकूलन यंत्रणा प्रभावित झाली.
एसी लोकलचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे बंद असल्याने डब्यातील तापमान वाढले. त्यामुळे अनेक प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले आणि श्वास घेण्यास त्रास झाला. परिस्थिती गंभीर होत असताना 3 ते 4 प्रवासी बेशुद्ध पडले. त्यामध्ये काही महिला प्रवाशांचाही समावेश होता.
बेशुद्ध पडलेल्या प्रवाशांना तातडीने लोकलमधून बाहेर काढण्यात आले. स्थानकावरील इतर प्रवाशांनी त्यांना प्लॅटफॉर्मवरील बाकांवर बसवून पाणी दिले तसेच वारा घालून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
या घटनेत अस्वस्थ झालेल्या सुगंधा सिंग आणि राधिका गोटूवलेकर या महिला प्रवाशांना प्राथमिक मदत देण्यात आली आणि त्यानंतर घरी सोडण्यात आले. फहीम अन्सारी यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही घरी सोडण्यात आले.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संबंधित एसी लोकलची सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली. पुढील प्रवासात कुर्ला स्थानकावर सर्व प्रवाशांना उतरवून ही लोकल सेवेतून बाजूला करण्यात आली. आता बिघाड झालेली लोकल दुरुस्तीसाठी रेल्वेच्या कार्यशाळेत पाठवण्यात येणार आहे.
या लोकलच्या आणखी दोन फेऱ्याही रद्द करण्यात आल्या असून, त्यांच्या जागी सामान्य नॉन-एसी लोकल चालवण्यात येणार आहेत.
गर्दीच्या वेळेत अधिक आरामदायी प्रवासासाठी अनेक प्रवासी जास्त भाडे देऊन एसी लोकलची निवड करतात. मात्र, एसी लोकलचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्यामुळे वातानुकूलन यंत्रणेत बिघाड झाल्यास डब्यातील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या घटनेनंतर एसी लोकलची देखभाल आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर काही सामान्य लोकलच्या जागी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत. एसी लोकलचे भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडत नसल्याची तसेच सामान्य लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून यापूर्वीही करण्यात आली आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी दरवाजाजवळ असल्यास स्वयंचलित दरवाजे बंद होत नसल्यामुळे एसी लोकलला सुरक्षित पर्याय मानले जाते. मात्र, या घटनेने बंदिस्त डब्यांतील आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था आणि तांत्रिक देखभालीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.